बीएमसी केंद्राची जेतेपदाला गवसणी

सामना प्रतिनिधी । मुंबई

शालेय आणि ज्युनियर स्तरावर युवकांत फुटबॉलची लोकप्रियता वाढवणाऱया बिपीन फुटबॉल अकादमीच्या आंतर केंद्र फुटबॉल स्पर्धेत यंदा बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांतील फुटबॉलपटूंनी अफलातून कामगिरी केली. त्यांनी उल्हासनगर, अंबरनाथ केंद्राला पराभूत करीत पहिल्यांदाच बीएमसी केंद्राला विजेतेपद पटकावून दिले. कुमार राठोड विजयाचा हीरो ठरला.

चर्चगेटच्या कर्नाटका स्पोर्टिंग्ज मैदानावर खेळविण्यात आलेल्या बिपीन आंतर केंद्र फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम लढतीत बीएमसी केंद्राने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करीत बलाढय़ उल्हासनगर, अंबरनाथ संघाला डोकेच वर काढू दिले नाही. कुमार राठोडच्या डबल धमाक्याच्या बळावर बीएमसी संघाने २-० असा शानदार विजय मिळवला. महापालिका शाळांतील फुटबॉलपटूंनी मिळविलेल्या या उज्ज्वल यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्राचे माजी फुटबॉलपटू प्रमोद साईल यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी एमडीएफएचे सरचिटणीस उदयन बॅनर्जी, कर्नाटका स्पोर्टिंग्जचे संयुक्त चिटणीस जया शेट्टी हे मान्यवर उपस्थित होते.

वैयक्तिक पारितोषिके  प्लेयर ऑफ दी टुर्नामेंट  कुमार राठोड (बीएमसी)

विविध केंद्रांचे सर्वोत्तम खेळाडू – कासा प्रजापती (चर्चगेट), राजू चौहान (कुलाबा), सुनील राठोड (बीएमसी), यश टाक (उल्हासनगर-अंबरनाथ), शुभम शिंदे (कांदिवली), प्रीत (विरार), यश मिस्त्री (अंधेरी).

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यामुळेच घवघवीत यश

एमडीएफएचे अध्यक्ष युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी फुटबॉल विकासासाठी मुंबईत राबवलेल्या उपक्रमांचा लाभ घेत महापालिका शाळांतील फुटबॉलपटूंनी यंदा बिपीन फुटबॉल स्पर्धेत कौतुकास्पद मजल मारली आणि पहिल्यांदाच विजेतेपदाचा बहुमान पटकावला. या संघाला युवा फुटबॉल प्रशिक्षक गणेश व त्यांच्या सहकार्यांचे मार्गदर्शन लाभले आहे. यंदाच्या स्पर्धेत आठ केंद्रांनी सहभाग घेतला होता. स्पर्धा संयोजक सुरेंद्र करकेरा यांनी बीएमसी संघाच्या शानदार कामगिरीचे कौतुक केले. या स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईत फुटबॉल विकासाची वाटचाल योग्य दिशेने होत असल्याबद्दल करकेरा यांनी समाधान व्यक्त केले.