खानाखजाना : बिसीबेळे भात

1

साहित्य ः पाऊण कप तांदूळ, पाव कप तूर डाळ, 1 चमचा चिंच, दीड कप चिरलेल्या भाज्या, मध्यम चौकोनी आकारात चिरलेल्या भाज्या (बटाटा, फरसबी, वांगं, गाजर, क्वॉलिफ्लॉवर)

मसाले ः 1 इंच दालचिनीचा तुकडा, 2 वेलच्या, 2 तमालपत्र.

फोडणीसाठी ः 1 चमचे तूप, अर्धा चमचा जिरे, हिंग, हळद, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा सांबार मसाला (शक्यतो घरगुती), चवीपुरते मीठ,

स्पेशल तडका ः 2 चमचे तूप, हिंग, 2-3 चमचे शेंगदाणे, 7-8 कढीपत्त्याची पाने.

कृती ः सर्वप्रथम तूरडाळ धुवून कुकरमध्ये शिजवून घ्यावी. त्यानंतर चिंच पाऊण कप गरम पाण्यात भिजत ठेवावी. 10 मिनिटांनी त्या पाण्यात चिंच कुस्करून कोळ वेगळा काढावा. त्यानंतर नॉनस्टिक पातेल्यात 1 चमचा तूप गरम करावे. त्यात दालचिनी, वेलची, तमालपत्र घालून 5-7 सेकंद परतावे. जिरे, हिंग, हळद आणि लाल तिखट घालून फोडणी करावी. या फोडणीत वांग सोडून चिरलेल्या सर्व भाज्या घालाव्यात. झाकण ठेवून 2 मिनिटे  वाफ काढावी. आता तांदूळ आणि 3 कप पाणी घालावे. चिंच कोळ आणि सांबार मसाला घालावा. झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजू द्यावे. आपल्याला एकदम मऊ आणि पातळसर भात शिजवायचा आहे त्याप्रमाणे पाणी घालावे. भात अर्धा शिजला की, शिजवलेली तूरडाळ आणि वांग्याच्या फोडी घालाव्यात. 10 मिनिटे झाकण ठेवून किंवा भात पूर्ण शिजेस्तोवर शिजवावे. नंतर भात ताटात वाढावा. लगेच कढईत 2 चमचे तूप गरम करावे त्यात हिंग आणि शेंगदाणे घालावेत. शेंगदाणे लालसर होईस्तोवर परतावे. शेंगदाणे लालसर झाले की, कढीपत्ता घालावा. ही फोडणी वाढलेल्या भातावर 1-2 चमचाभर घालावी. या फोडणीमुळे भाताची चव अजून खुलते. त्यामुळे ही फोडणी महत्त्वाची आहे.

टीप ः हा भात वरून भरपूर साजूक तूप घालून खावा. शिजवलेली तूरडाळ आमटीसाठी रवीने घुसळतो तशी घुसळू नये.