भाजपाकडून जनतेची फसवणूक, राष्ट्रवादी काँग्रेसची

सामना प्रतिनिधी । कुडाळ

पोकळ घोषणाबाजी करून सत्तेवर आलेल्या केंद्र व राज्यातील भाजपा सरकार मुजोरी दाखवून जनतेची फसवणूक करीत आहे. आरोग्य सुविधा कोलमडली आहे, रस्त्यांची चाळण झाली असून महागाईने जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीत जनता त्यांना निश्चितच जागा दाखवून देईल. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सिंधुदुर्ग दौरा हा केवळ मुंबईवरून गोव्याला जाणारा असाच होता अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष प्रसाद रेगे यांनी दिली. तसेच 2019 च्या निवडणुकीत आघाडीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल, असेही ते म्हणाले.

कुडाळ एमआयडीसी येथील शासकीय विश्रामगृहावर रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत रेगे बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष रूपेश पावसकर, उत्तम सराफदार, अशोक कांदे, संग्राम सावंत, लालू पटेल, संतोष पाटकर, सागर पालकर, सागर पालकर, प्रथमेश माने, अरूण भोवर आदी उपस्थित होते.

रेगे यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, निवडणुकीत पोकळ घोषणा करून भाजपा सरकार सत्तेवर आले. मात्र या सरकारने जनतेच्या पदरात निराशाच पाडली आहे. इंधन दरवाढ, वाढती महागाई यामुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे. जिथे जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो तिथे तिथे सर्वसामान्य जनतेचे महागाईने वाटोळे होत आहे. भाजपाच्या आमदारांकडून वादग्रस्त विधाने होऊनही त्यांना पाठीशी घालण्याचे काम सरकार मधील मंत्री करीत आहेत. 2019 च्या निवडणुकीत जनता त्यांची जागा दाखवून देणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात जि.प.निहाय दौरे व बैठका घेणार आहे. गणेशोत्सवानंतर यांच्या बैठकांना सुरूवात केली जाणार असून त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यावर त्या त्या भागाची जबाबदारी दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई – गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम आघाडी सरकारच्या काळात प्रस्तावित होते. त्यामुळे या सरकारने त्याचे श्रेय घेऊ नये. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेला महामार्ग पाहणीचा दौरा हा केवळ जिल्हावासियांच्या डोळ्यात धुळफेक करणारा होता. अगदी कमी वेळात आणि घाईगडबडीत त्यांनी खड्यांची कशी पाहणी केली हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांचा हा दौरा मुंबईवरून गोव्याला जाणारा होता की खरच खड्डे पाहणी दौरा होता? असा सवाल उपस्थित करीत त्यांच्या दौ-यावर टीका केली. चिपी विमानतळ व्हावे ही आमचीही इच्छा आहे. मात्र या विमानतळाकडे जाणारे रस्ते व अन्य सुविधांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. 2019 च्या निवडणुकीत आघाडीचा निर्णय वरिष्ठ पातळी घेतला जाईल. वरिष्ठांकडून जो आदेश येईल तो आम्ही पाळू असे रेगे यांनी यावेळी सांगितले.