व्वा रे पार्टी विथ डिफरन्स! डान्स बार चालकांकडून खंडणी उकळणाऱ्या भाजप नगरसेवकाला अटक

 

पार्टी विथ डिफरन्सचा ढोल बडवणाऱ्या भाजपच्या कारनाम्यांचा एकापाठोपाठ एक भांडाफोड होत आहे. भिवंडीत डान्स बार चालकांकडून आठ लाखांची खंडणी उकळणाऱ्या भाजप नगरसेवकाला त्याच्या साथीदारांसह पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. हितेश कुंभार असे या आरोपीचे नाव असून तो अकोले नगरपंचायतीचा नगरसेवक आहे. भिवंडीत येऊन खंडणी उकळण्याचा कारनामा त्याच्या चांगलाच अंगलट आला आहे.

मुंबई – नाशिक महामार्गालगत भिवंडी बायपास रस्त्यावर अनेक डान्स बार आहेत. पैकी लैला डान्स बार हा संतोष भोईर व हरीश हेगडे हे भागीदारीत चालवतात. या डान्स बारमध्ये दोन दिवसांपूर्वी हितेश कुंभार आला. त्याने आपण मुंबईचा भाजपचा नगरसेवक असून तुम्हाला या मार्गावर बार चालवायचे असेल तर ऑर्केस्ट्रा बारचे पाच लाख रुपये व सर्व्हिस बारचे तीन लाख रुपये अशी एकरकमी आठ लाखांची खंडणी मागितली. शिवाय 25 हजार रुपये महिन्याला हप्ता द्यावा लागेल असे धमकावले. यावेळी संतोष भोईर यांनी मी इतर डान्स बार चालकांना विचारून सांगतो. तुम्ही उद्या या, असे सांगितले. त्यानंतर हितेश कुंभार आपल्या साथीदारांसह तेथून निघून गेला.त्यानंतर दुसऱ्या दिवशी हितेश कुंभार पुन्हा लैला बार येथे आपल्या साथीदारांसह आला आणि खंडणीची मागणी केली. यावेळी बार चालक संतोष भोईर यांनी कोनगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनाचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी धाव घेत सापळा रचला. त्यावेळी नऊ बार चालकांकडून २७ हजार टोकन घेताना हितेश कुंभार आणि त्याचे साथीदार देवेंद्र खुटेकर, राकेश कुंभकर्ण यांना रंगेहाथ अटक केली.

धमकावण्यासाठी फडणवीसांना पाठवलेल्या निवेदनाचा आधार
पोलीस चौकशीत हितेश कुंभार हा मुंबईचा नसून नगर जिल्ह्यातील अकोले नगरपंचायतीमधील भाजप नगरसेवक असल्याचे निष्पन्न झाले. त्याने नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे परिसरातील नियमबाह्य डान्स बारवर कारवाई करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनाची प्रत दाखवून हितेश कुंभार बार मालकांना धमकावत होता.