विकास कामेच होत नाहीत , बजेट तयार कशाला केले? भाजप नगरसेविकाचा घरचा आहेर

सामना प्रतिनिधी । पुणे

पालिकेत नगरसेवक म्हणुन निवडुन येउन नऊ महिन्याचा कालावधी झाला आहे. तरीही विकास कामे होत नाही. त्यामुळे बजेट केवळ दाखवायला तयार केले का अशा शब्दात भाजपच्या नगरसेविकांनी घरचा आहेर दिला. त्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांची सभागृहात यावरचा रोष सावरण्यासाठी पळापळ झाली.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत डिसेंबर महिना उजाडला तरी विकास कामे होत नाही याकडे शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी लक्ष वेधले. त्यावर पालिकेच्या दोन्ही अतिरिक्त आयुक्त फाईल्सवर सह्या करत नाही. त्या फाईल अडवुन ठेवतात. त्यामुळे कामे रखडली आहेत याकडेही लक्ष वेधण्यात आले. त्यावर सर्वपक्षीय नगरसेवकाबरोबर भाजपच्या नगरसेविकांनीही विकास कामे होत नसल्याबददल नाराजी व्यक्त केली. प्रभागामधील विकास कामे होत नाही. मग बजेट कशाला तयार केले अशा शब्दात टिका करण्यात आली. त्यावर प्रभाग समित्यामधील विकास कामे येत्या पंधरा दिवसात मार्गी लावली जातील असे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले.

भाजपच्या अभिनंदनाच्या तहकुबीवर टिकेची झोड

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राजकीय तहकुबी मांडण्याची नाही असा संकेत आहे. मात्र हा संकेत पायदळी तुडवून गुजरात आणि हिमाचल प्रदेशात भाजपला मिळलेल्या विजयाबददल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदाची तहकुबी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी मांडली. त्यावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने टिकेची झोड उठविली. हिंदुहदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताला धरुन भाजप राज्यात वाढली. आता हीच भाजप सत्तेचा माज करत आहे अशा शब्दात शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी टिका केली.

गुजरातमध्ये काँग्रेस हरली आणि भाजप जिंकली आहे. तरी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर हासु आहे. त्यातच सर्वकाही आले आहे, असे काँग्रेसचे नगरसेवक अजित दरेकर यांनी सांगितले. राजकीय तहकुबी मांडण्याचा सभागृहाचा संकेत नाही. हा संकेत भाजपने पायदळी तुडविला आहे. गुजरात मॉडेल डळमळले आहे, असे विरोधीपक्षनेते चेतन तुपे यांनी सांगितले. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी एकही मारा लेकीन क्या मारा असे सांगुन काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे म्हणाले, सत्ता आली असली तरी भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत.