भाजप महायुतीला एक्झिट पोलपेक्षाही जास्त जागा मिळतील, सुरेश प्रभू यांचा दावा

219

सामना प्रतिनिधी । मालवण

लोकसभा निवडणुकीदरम्यान आपण प्रचारासाठी देशातील 22 राज्यात फिरलो. या प्रचारादरम्यान जनतेचा कल भाजप महायुतीच्या बाजूने असल्याचे आपण अनुभवले. त्यामुळेच जास्तीत जास्त जागा महायुतीला मिळून देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी विराजमान होतील, असा दावा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी मालवण येथे बोलताना व्यक्त केला. मालवण मेढा येथील आपल्या निवासस्थानी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर, विलास हडकर, नगरसेविका पूजा सरकारे आदी उपस्थित होते.

सुरेश प्रभू म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी अनेक नवीन संकल्पना व योजना अंमलात आणून सर्वसामान्यांचा विकास कसा साधता येईल याचा विचार केला. म्हणूनच जनता मोदींच्या बाजूने आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आपण 22 राज्यात प्रचार दौरा केला. या दरम्यान भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत लोकांमध्ये प्रेमाची भावना असल्याचे आपण अनुभवले आणि या प्रेमापोटी लोकच स्वतः भाजपचा प्रचार करत असल्याचे दिसले. भाजपच्या मागे जनतेची मोठी शक्ती असल्याचे दिसून आले. त्यामुळे बहुसंख्य जागांवर महायुतीचे उमेदवार जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी होऊन मागच्या निवडणुकीपेक्षा जास्त जागांसह पुन्हा एकदा भाजपची सत्ता येईल तसेच नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान बनतील यात कोणतीही शंका नाही. येणारे भाजपचे सरकार हे अल्पमतातील नव्हे तर बहुमतातील असेल, असेही प्रभू म्हणाले.

विरोधकांकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही
विरोधकांकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही आणि जनतेच्या विकासाचा कोणताही कार्यक्रम नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत विरोधक उघडे पडले. विविध एक्झिट पोलचे संभावित निकाल येत असले तरी निवडणुकीच्या प्रत्यक्ष निकालात प्रत्येकाच्या अपेक्षेपेक्षा जास्त जागा भाजपला मिळतील असा दावाही यावेळी सुरेश प्रभूंनी केला. तसेच प्रचारा दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातही आपण फिरलो. काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात भाजपचेच वातवरण असल्याचा अनुभव आपण घेतला. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक मताधिक्य मिळेल असेही प्रभू म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या