अवघा देश दु:खात असताना गोरेगावमध्ये भाजपची चमकोगिरी, पुलाचे श्रेय लाटण्याचा खटाटोप


सामना प्रतिनिधी, मुंबई

माजी पंतप्रधान ‘भारतरत्न’ अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे अवघा देश दुःखात असताना भाजपच्या नगरसेवक आणि पक्ष कार्यकर्त्यांनी शुक्रवारी गोरेगावच्या वीर सावरकर पुलाचे श्रेय लाटण्यासाठी चक्क फोटोसेशन केले. शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे झालेला हा पूल आज वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. विशेष म्हणजे अटलजींची प्रकृती नाजूक असतानाच उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर यांनी गुरुवारी जाहीर केले होते. तरीदेखील भाजपने चमकोगिरी केल्याने तीव्र निषेध केला जात आहे.

गोरेगाव पूर्व-पश्चिमला जोडणाऱ्या आणि तीन लेन्स असणाऱ्या पुलामुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूककोंडी फुटणार आहे. या पुलाचे उद्घाटन 17 ऑगस्ट रोजी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार होते, मात्र अटलजी अत्यवस्थ असल्यामुळे उद्घाटन न करताच हा पूल जनतेसाठी खुला करण्याचे निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले होते. यातच अटलजींचे निधन झाल्यामुळे सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तरीदेखील आज प्रत्यक्षात पूल खुला करताना भाजप नगरसेवकांनी पदाधिकाऱ्यांसह दाखल होत फोटोसेशन केले.

काय घडले…
शुक्रवारी सकाळी 10 वाजता महापालिकेच्या पूल विभागाचे अधिकारी व वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र यावेळी भाजपचे पी-दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष संदीप पटेल यांच्यासह राजुल देसाई, श्रीकला पिल्ले, भाजपचे पदाधिकारी समीर देसाई यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते दाखल झाले. भाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी यावेळी फोटोसेशन केले. भाजपची ही चमकोगिरी निषेधार्ह असल्याचे स्थापत्य समिती अध्यक्षा आणि विभाग संघटक साधना माने यांनी सांगितले.