कर्नाटकात भाजपने दिले भ्रष्टाचारी-बलात्कारी उमेदवार?

1

सामना ऑनलाईन । बंगळुरू

आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षातर्फे ८२ उमेदवारांची दुसरी यादी सोमवारी संध्याकाळी जाहीर करण्यात आली. पण, या यादीत काही अशी नावंही सामील आहेत ज्यांच्यावर भ्रष्टाचार आणि बलात्काराचे आरोप आहेत. भाजपने आतापर्यंत १५४ जागांसाठीचे उमेदवार घोषित केले असून त्यात फक्त दोनच महिलांचा समावेश आहे.

या यादीत सोमशेखर रेड्डी यांना बेल्लारी येथून तिकीट देण्यात आलं आहे. सोमशेखर हे कर्नाटकमधील खाण घोटाळ्याचा आरोप असलेल्या जी. जनार्दन रेड्डी यांचे भाऊ आहेत. सोमशेखर यांनाही खाण घोटाळ्यातील सहभागावरून मंत्रिमंडळातून पायउतार व्हावं लागलं होतं. या खेरीज भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या दोन माजी आमदारांसह बलात्काराचा आरोप असलेल्या एका आमदारालाही उमेदवारी देण्यात आली आहे.

शिवाय मलूर आणि शिवाजी नगर या दोन प्रभागातून उमेदवारी मिळालेले एस. एन. कृष्णैय्या सेट्टी आणि कट्टा सुब्रमण्यम नायडू यांच्यावरही भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे एकीकडे भ्रष्टाचारमुक्त हिंदुस्थान, बेटी बचाओच्या घोषणा द्यायच्या आणि दुसरीकडे भ्रष्टाचार-बलात्काराचे आरोपी असलेल्यांना तिकीट, अशी दुहेरी जुमलाबाजी भाजप करत असल्याची टीका होत आहे.