‘आत-बाहेर’ खदखद वाढत आहे!

>>नीलेश कुलकर्णी<<  

[email protected]

पक्षांतर्गत ‘सर्जिकल स्ट्राइक’ करून माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी पार्टी विथ डिफरन्स वगैरे असलेल्या भारतीय जनता पक्षात आणि केंद्र सरकारमध्ये गेल्या आठवडय़ात मोठी खळबळ उडवून दिली. खासदार शत्रुघ्न सिन्हा, वरुण गांधी आदी मंडळीही दिवाळीआधीच भाजपच्या अंगणात फटाके फोडताना दिसत आहेत. मोदी सरकार आल्यापासून पक्षातील अनेकांची तोंड दाबून बुक्क्याचा मार अशी अवस्था होती. मात्र यशवंत सिन्हांचा अर्थव्यवस्थेवरचा ‘सर्जिकल स्ट्राइक’ अनेकांसाठी भविष्यात प्रेरक ठरणार आहे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे संपूर्ण देशालाच ग्लानी आली आहे. त्यात ‘अच्छे दिन’चे स्वप्न मृगजळाप्रमाणे भासत असल्याने भाजप आणि संघपरिवाराप्रमाणेच जनतेच्या मनातही अस्वस्थता आहे. थोडक्यात ‘आत-बाहेर’ खदखद वाढते आहे. भाजपच्या पक्षीय राजकारणाशी जनतेला काहीही घेणेदेणे नाही. मात्र जनतेचा क्रोध भडकण्याआधीच सरकारला काहीतरी करावे लागेल, अन्यथा भविष्याचा मार्ग बिकट आहे.

जुन्याच योजनांचे नव्याने बारसे करून जनतेला घुगऱ्या खाऊ घालण्याचा कार्यक्रम सध्या जोरात सुरू आहे. त्यामुळे मे २०१७ पर्यंत देशातील प्रत्येक गावांत वीज पोहोचवू अशी प्रतिज्ञा करून दीनदयाळ उपाध्याय या सत्पुरुषाचे नाव त्या योजनेला दिले गेले. पंतप्रधानांनी या योजनेला ‘सौभाग्य’ असे नवे नाव दिले. बदल झाला तो इतकाच! या वरवरच्या बदलांना आणि रोजच्या घोषणांना जनता कंटाळली आहे. सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही नागपुरातून दांडपट्टा चालवला आहे. संघप्रणीत भारतीय मजदूर संघ आपल्याच सरकारविरोधात रस्त्यावर उतरला आहे. हे कशाचे द्योतक आहे? पक्षशिस्त आणि माझ्यामुळे तुम्ही निवडून आलात, असे सांगून समोरच्याला गप्प बसवून प्रश्न सुटणार नाहीत. भाजपचे अनेक खासदार व नेते खासगीमध्ये बोलताना, ‘भाईसाब पुरी वाट लग गयी है’, अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया नोंदवताना दिसतात. सोळाव्या लोकसभेच्या सत्ताधारी पक्षाच्या खासदारांना मतदारसंघात आणि सरकारमध्ये काडीची किंमत नाही. त्याचवेळी सभागृहात दिवसभर बसून राहण्याचा दंडक. त्यामुळे अनेक खासदार आगामी लोकसभा लढविण्याच्या मानसिकतेत नाहीत. साडेतीन वर्षांपासूनची ही खदखद हळूहळू वाढत जात आहे. यापूर्वी कीर्ती आझाद, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासारख्यांनी थोडेफार तोंड उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याची ना पक्षाने दखल घेतली, ना मीडियाने. मात्र यशवंत सिन्हांसारख्या जाणकार माणसानेच तोंड उघडल्याने सरकारची पळता भुई थोडी झाली आहे. ज्या अरुण जेटलींना नोटबंदीचा निर्णयही माहिती नव्हता त्यांनाच आता बळीचा बकरा बनवले जातेय, अशीही दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भाजपमधील हे अंतर्गत राजकारण त्यांचे त्यांनाच लखलाभ होवो. मात्र जनतेच्या मनात वाढत असलेली खदखद तरी ओळखा.

आदर ठेवा!

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीनिमित्त अख्खी दिल्ली नवलाख दिव्यांनी उजळून निघाली होती. राजधानीभर बॅनर्स लावले गेले. स्वागताच्या कमानीही होत्या. त्यावर ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणींचेही स्वागताचे बॅनर होते. मात्र सोशल मीडियावर आडवाणींची ‘वेलकम, बट नो एण्ट्री’ अशी खिल्ली उडवली गेली. ज्या माणसाने आपल्या आयुष्याची पन्नासहून अधिक वर्षे एका पक्षासाठी आणि एका विचारासाठी दिली त्याची ‘पंतप्रधानही नाही, राष्ट्रपतीपदही नाही आणि आता साधा प्रवेशही नाही’ अशी चेष्टा केली गेली. खरे म्हणजे अटलबिहारी वाजपेयी आणि आडवाणींमुळेच आज ही मंडळी सत्तेत बसली आहे. मात्र त्यांच्याच काळात या दोघांकडे दुर्लक्ष होणे वेदनादायक आहे. सोशल मीडियावरील एकदंरीत ट्रेंड पाहता हे उपद्व्याप कोणाचे असतील हे वेगळे सांगायची गरज नाही! दुसरीकडे साक्षात अटलजींचेच नाव मतदार यादीतून काढण्याचे महान कार्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने केले. वाजपेयी मतदानासाठी सातत्याने अनुपस्थित राहत असल्याने त्यांचे नाव मतदार यादीतून वगळले गेले म्हणे! वाजपेयी आणि आडवाणींसारख्यांनी टाचा घासून भाजपचे कमळ रुजवले. त्यामुळेच आजचे ‘अच्छे दिन’ भाजपला पाहायला मिळाले आहेत. तेव्हा पक्ष म्हणून नाही तर किमान वयाचा तरी आदर ठेवा. सन्मान करता आला नाही तरी चालेल, पण अवहेलना करू नका असे सांगायची वेळ या दोघांवर आली आहे.

दिग्गीराजांची ‘नर्मदा परिक्रमा’…

‘करून करून भागले आणि देवपुजेला लागले’ अशी आपल्याकडे म्हण आहे. ती म्हण सध्या काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंग यांच्या बाबतीत लागू पडते आहे. दिग्विजय हे धार्मिक वृत्तीचे गृहस्थ आहेत. त्यांना तसे धार्मिक स्वातंत्र्यही आहे. त्याबद्दल टीकेचे कोणतेच कारण नाही. मात्र मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचे ढोल वाजायला सुरुवात झालेली असताना दिग्गीराजांनी तात्पुरता राजसंन्यास घेऊन ‘नर्मदा परिक्रमा’ करण्याचा निर्धार केला आहे. नर्मदा परिक्रमा करायची असल्याने मला सहा महिन्यांची सुट्टी द्या, असा रजेचा अर्ज त्यांनी आपले शिष्योत्तम राहुल गांधींना केला. राहुलबाबांनी दिग्गींची रजा मंजूर करूनच अमेरिकेकडे उड्डाण घेतले आणि इकडे दिग्गीराजांनी ‘नर्मदे हर हर’ करत मजल दरमजल प्रवास सुरू केला आहे. आध्यात्मिक कार्यासाठी आणि मनःशांती साठी आपण ही नर्मदा परिक्रमा करत असल्याचे दिग्विजय यांनी सांगितलेले आहे. मात्र मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावर डोळा ठेवून दिग्विजय सिंग हे करत असल्याचा त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांचा आरोप आहे. काँग्रेसची आणि राहुल गांधी यांची होता होईल तेवढी वाट लावून झाल्यानंतर दिग्विजय सिंग आणखी कोणते पुण्य पदरात पाडून घेणार आहेत, असा खोचक सवाल यानिमित्ताने त्यांचे पक्षांतर्गत विरोधक विचारत आहेत. मध्य प्रदेशमध्ये सलग १५ वर्षे भाजपचे सरकार असल्याने यावेळी बदल होईल अशी खोटी आशा बाळगून सध्या दिग्विजय सिंगांसह ज्योतिरादित्य शिंदे आणि कमलनाथ हे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. अर्थात मध्य प्रदेशात शिवराजसिंग चौहान यांचे सरकार पुन्हा चौथ्यांदा सत्तेवर आलेच तर मात्र दिग्विजय सिंगांनी कायमची नर्मदा परिक्रमा करावी लागेल. बघूया काय होते ते!