भाजप प्रत्येक मुसलमानाला शत्रू समजतो!

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

एनआरसीच्या अहवालात आसाममध्ये ४० लाख घुसखोर असल्याचे समोर आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. यात बांग्लादेशी व रोहिंग्या मुस्लिमांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. यावर बोलताना एआययूडीएफचे अध्यक्ष बद्रुद्दीन अजमल यांनी भाजपला लक्ष्य केले आहे.” भाजप प्रत्येक मुसलमानाला आपला शत्रू मानत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.”

दरम्यान, आसाममधील ४० लाख घुसखोरांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरणही तापलं आहे. संसदेतही याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. या पार्श्वभूमीवर एका हिंदी वृत्तवाहिनीने लाईव्ह चर्चासत्राचे आयोजन केले होते. यात अजमल यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपची पार्श्वभूमी ही आरएसएस व हिंदुत्ववादी संघटनांची आहे. या दोघांचे शत्रू जर कोणी असतील तर ते फक्त मुसलमान असून यात कसलीच शंका नाही. हे दोघेही मुसलमानानांनाच कट्टर शत्रू मानतात, असे अजमल यावेळी म्हणाले. तसेच सध्या आसाममधील घुसखोरीबद्दल जे काही चित्र दाखवलं जात आहे. ते बघून कोट्यवधींच्या संख्येत बांग्लादेशी मुसलमान येथे राहत असल्याचं लोकांना वाटू लागलं आहे. आमच्या कपाळावर लागलेला हा कलंक पुसून टाका असं मी स्वत: संसदेत सांगितलं असून हा प्रश्न सोडवलाच पाहिजे असंही अजमल यांनी म्हटलं.

त्याचबरोबर एनआरसी व्हायलाच हवी ही आमची ४० वर्षांपासूनची मागणी आहे. त्यानंतरच सत्य बाहेर येईल असंही ते म्हणाले. भाजपच्या आमदारांमुळेच हिंदू मुसलमान वाद होत आहेत. याबद्दल आपण गृह मंत्रालयाकडे तक्रारही केल्याचे अजमल यांनी यावेळी सांगितले. तसेच भाजप आमदार खुलेआम हिंदू-मुस्लीम भेदभाव करत आहेत. याविरोधात तक्रार करूनही त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही, असा आरोपही अजमल यांनी केला आहे.

summery bjp is anti muslim aiudf president ajmal blame .