२०१९ला भाजप सत्तेत येणार नाही!

chandrababu-naidu

सामना ऑनलाईन । हैदराबाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अहंकार हाच भाजपचा शत्रू आहे. पुढील वर्षात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा सत्तेवर येणार नाही ही काळय़ा दगडावरची रेघ आहे, असे ‘तेलगू देसम’चे नेते आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना ठामपणे सांगितले. २०१९ ला केंद्रातील पुढील सरकार स्थापन करण्यात प्रादेशिक पक्षच महत्त्वाची आणि निर्णायक भूमिका बजावतील, असेही ते म्हणाले.

तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व करण्याची संधी मला यापूर्वी दोनदा आली होती. पण ती ऑफर मी नाकारली होती. आताही राष्ट्रीय राजकारणापेक्षा माझे सारे लक्ष माझ्या राज्यावर केंद्रित केले आहे, असे चंद्राबाबू यांनी सांगितले.

मी १९९५ सालात आंध्रचा पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो. तर मोदी यांना मुख्यमंत्रीपदाची संधी गुजरातमध्ये २००२ सालात मिळाली, मोदी हे मला ‘ज्युनियर’ आहेत. पण माझ्या राज्याच्या हितासाठी मी त्यांना पराकोटीचा मान दिला. मात्र त्यांना त्याची अजिबात कदर नव्हती. तुमच्या हाती आजघडीला सत्ता असेल, पण ती कायमसाठीची नाही. नाती आणि संबंध हे कायमसाठी असतात. मात्र त्याचे भान मोदी यांना राहिलेले नाही.

मोदी सरकारने २०१४ सालात त्यांना मिळालेल्या जनादेशाची पुरती वाट लावली आहे. सारी व्यवस्था कोलमडली आहे. ‘एनपीए’ म्हणजे बुडित कर्जामुळे बँकांचे दिवाळे वाजले आहे. नोटाबंदी, जीएसटीमुळे जनतेला झळ बसली आहे. मोदी यांची विश्वासार्हता साफ धुळीला मिळाली आहे.

मोदींचा अहंकार हाच भाजपचा शत्रू

मोदी यांच्या अहंकारामुळे भाजपला मित्रपक्षांना गमवावे लागत आहे. केंद्रात भाजपकडे पूर्ण बहुमत असल्याने मित्रपक्षांना कमजोर करीत आपल्या मुठीत ठेवायचे असे मोदी यांचे धोरण आहे. त्यामुळे आपले निमूटपणे ऐकून घेणारे कमकुवत मित्रपक्ष त्यांना भारी आवडतात.

राज्यातील जनतेचा तुमच्यावर विश्वास असेपर्यंत युतीआघाडी झाली नाही तरी काहीच फरक पडत नसतो.

भाजपची साथ सोडून ‘एनडीए’तून बाहेर पडलेल्या चंद्राबाबू यांनी आंध्र प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचीही घोषणा केली आहे. आमची कोणाशी युती असो वा नसो, ‘तेलगू देसम’ नेहमीच बहुमत मिळवून सत्तेवर आलेला आहे, असे चंद्राबाबू म्हणाले. आमचा ‘तेलगू देसम’ हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष होता. त्यातच मी स्वतः कणखर आणि स्वतंत्र बाण्याचा आहे. त्यामुळे ‘एनडीए’मध्ये आम्ही असेपर्यंत भाजपला वाव नाही, हे मोदी यांना कळून चुकले होते, असेही त्यांनी सांगितले.