भाजपमध्ये ‘टू मॅन आर्मी’चेच राज्य, शॉटगनचा बॉम्बगोळा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण आडवाणी हे देशाचे राष्ट्रपती व्हावेत असेच पक्षातील ८० टक्के लोकांना वाटत होते, असा दावा करून खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपमध्ये सध्या ‘टू मॅन आर्मी’चे राज्य चालते अशा शब्दांत आज तोफ डागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे नाव न घेता त्यांच्यावर सिन्हा यांनी एका वृत्तवाहिनीवर मुलाखत देताना निशाणा साधला.

भाजपचे लोकसभेत जेव्हा दोनच खासदार होते त्या काळात आपण पक्षात आलो होतो याची आठवण करून देतानाच भाजप हा माझा पहिला आणि शेवटचा पक्ष आहे असे त्यांनी नमूद केले. लालकृष्ण आडवाणी हे आपले मित्र, मार्गदर्शक, गुरू आणि अखेरचे नेते आहेत, असेही सिन्हा यांनी आवर्जून सांगितले.

भाजपच्या प्रचारातून मला डावलण्यात आल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत बैठक घेण्याचा प्रयत्न केला, पण आमची बैठक काही झालीच नाही. तसेच काही आठवडय़ांपूर्वी मी पंतप्रधानांना भेटण्यासाठी प्रयत्न केले, पण मला वेळ देण्यात आली नाही.शत्रुघ्न सिन्हा, खासदार, भाजप