भाजपचा ‘पारदर्शक’ कारभार, तिकिटासाठी मागितले २ लाख

सामना ऑनलाईन । नाशिक

पारदर्शक कारभाराचा टेंभा मिरवणाऱ्या भाजपचा खरा चेहरा नाशिकमध्ये समोर आला आहे. महापालिका निवडणुकांच्या तिकीटासाठी भाजपच्या कार्यालयातच पैशांची मागणी केली जात असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे भाजपचे ‘खायचे’ दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे अशी चर्चा सध्या रंगली आहे.

नाशिकमध्ये भाजपचे कार्यकर्ते उमेदवारी मिळवण्यासाठी धडपड करत होते. मात्र पारदर्शकतेचा आग्रह धरल्याची भाषा करणारी भाजप उमेदवारी देताना मात्र थेट पैशांची मागणी करताना समोर आले. नाशिकमध्ये भाजपचे सरचिटणीस, काही कार्यकर्ते आणि कार्यालय सचिव शेंदूर्णीकर यांनी उमेदवारांकडून थेट दोन-दोन लाख रुपये मागितल्याचे व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशाची मागणी करण्यात येते आहे, तिकिटांसाठी मोठे पैसे मोजावे लागत आहे, असे आरोप भाजपचे कार्यकर्ते करत होते. आता हा व्हिडिओसमोर आल्याने भाजपची चांगलीच गोची झाली आहे. अर्थात हे पैसे पक्ष आणि निवडणुकीच्या प्रचारासाठी मागितल्याचे सांगून भाजप सारवासारव करण्याचा प्रयत्न करत आहे.