पोलिसांनी तुमची भांडी घासायची काय?

वाल्या मंडळींचा उच्छाद

सत्ता टिकवण्यासाठी व पक्षाच्या विजयासाठी ‘वाल्या’ मंडळास डोक्यावर घेऊन नाचायचे व त्याच वाल्या मंडळाने बेफाम होऊन पोलिसांचे धिंडवडे काढायचे हे लक्षण महाराष्ट्राला खड्डय़ात घालणारे आहे. हवेतून मिळालेल्या सत्तेची हवा डोक्यात जाते तेव्हा भल्याभल्यांचे पाय जमिनीवर राहत नाहीत. येथे भले कोण? सगळेच ‘वाल्या’ आहेत. या वाल्यांपासून महाराष्ट्र वाचवा. शेतकरी संपावर गेले तसे पोलीसही सरकारी वाल्यांच्या विरोधात संपावर जातील, अशी परिस्थिती निर्माण होऊ नये.

सत्ता डोक्यात गेली की जमिनीवरचे पायही खांद्यावर घेऊन काही लोक चालू लागतात. पण हे चालणे नसते, तर हवेतील तात्पुरते तरंगणे असते. सत्ताधारी भाजप पक्षाचे खासदार, आमदार, नगरसेवक मंडळी सध्या ज्या बेगुमान पद्धतीने वागत आहेत ते पक्षाच्या संस्कृतीला व परंपरेला शोभणारे नाही. विदर्भातील एक भाजप आमदार राजूभाई तोडसम यांनी एका ठेकेदारास धमक्या – शिव्या देऊन वीसेक लाखांची खंडणी मागितल्याचा ‘व्हिडीओ’ सध्या गाजतो आहे. पुन्हा हे आमदार महाशय सरळ सरळ राज्याचे सरळमार्गी मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांचे नाव घेतात. जणू काही या खंडणीतला वाटा मुख्यमंत्री कार्यालयालाच पोहोचणार होता. पण या आमदार महाशयांवर कायद्याने काय कारवाई झाली? या ठेकेदाराचे डोळ्यात अश्रू आणीत असे म्हणणे आहे की, ‘भारतीय जनता पक्षाला सत्तेवर आणून आम्ही आमच्या गळ्याभोवती फाशीचा फंदाच घालून घेतला.’ सरकारविरुद्धचा हा संताप आणि भाजपास   सत्तेवर आणल्याबद्दलचा

हा पश्चात्ताप असेल तर

मुख्यमंत्र्यांनी ही धोक्याची घंटा वेळीच ओळखायला हवी. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेवर भ्रष्टाचार आणि खंडणीखोरीचे आरोप करणारे आता कोठे गोटय़ा खेळत बसले आहेत? भाजपात निवडणुका जिंकण्यासाठी जे ‘वाल्या’ मंडळ घेतले त्यांच्या चारित्र्याची ही फसफस आहे. मुंबईतील एक भाजप आमदार अमित साटम फेरीवाल्यांच्या प्रश्नांवरून पोलिसांना आई-बहिणीवरून शिव्या देताना एका ‘व्हिडीओ’मध्ये दिसत आहे. परिवर्तन म्हणायचे ते हेच काय? पोलिसांना फक्त भरचौकात नागडे करून मारायचेच काय ते कमी ठेवले आहे. सत्ताधारी पक्षाच्या लोकांना नेहमी असेच वाटत आले आहे की, पोलीस व सरकारी यंत्रणा ही त्यांची गुलाम आहे व पोलिसांनी सत्ताधाऱयांचे बेइमान आदेश पाळायलाच हवेत. पोलिसांनी सत्ताधाऱयांच्या घरची भांडी घासावीत असेही त्यांना वाटते. अशा वेळी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी महत्त्वाची ठरते. पण तेथेही सब घोडे बारा टकेच आहे. उद्या मुंबईसह महाराष्ट्रातील तमाम पोलीस वर्गाने भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणी मोहिमेत सहभागी व्हावे, असा एखादा फतवा निघाला तरी आश्चर्य वाटू नये. पंतप्रधान मोदी यांनी देशातील व्ही.आय.पी. कल्चर संपविण्यासाठी जिवाचे रान केले आहे. स्वतःचे व राष्ट्रपतींचे सोडून

सगळ्यांच्याच डोक्यावरचे

लाल दिवे त्यांनी क्षणात विझवून टाकले. लाल दिव्यांचा माज हा सत्तेचा माज असतो. तो माज उतरायलाच हवा. पण लाल दिवे विझवले तरी सत्ताधारी ‘वाल्यां’चा माज काही उतरायला तयार नाही. ‘वाल्या’ मंडळाचा उच्छाद व हाणामाऱया सुरूच आहेत. ‘वर’चा आशीर्वाद असल्याशिवाय हे खालचे ‘वाल्या’ मंडळ असे माजणार नाही. हा मजकूर लिहीत असताना मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातही भाजप नगरसेवक दयाशंकर तिवारी याने पोलिसांना शिवीगाळ केल्याचे प्रकरण समोर आले आहे. पोलीस यंत्रणेविरुद्ध चीड असू शकते, पण त्यासाठी कायदा हातात घेणे हे समर्थनीय ठरत नाही. याला कायद्याचे राज्य म्हणता येणार नाही. सत्ता टिकवण्यासाठी व पक्षाच्या विजयासाठी ‘वाल्या’ मंडळास डोक्यावर घेऊन नाचायचे व त्याच वाल्या मंडळाने बेफाम होऊन पोलिसांचे धिंडवडे काढायचे हे लक्षण महाराष्ट्राला खड्डय़ात घालणारे आहे. हवेतून मिळालेल्या सत्तेची हवा डोक्यात जाते तेव्हा भल्याभल्यांचे पाय जमिनीवर राहत नाहीत. येथे भले कोण? सगळेच ‘वाल्या’ आहेत. या वाल्यांपासून महाराष्ट्र वाचवा. शेतकरी संपावर गेले तसे पोलीसही सरकारी वाल्यांच्या विरोधात संपावर जातील, अशी परिस्थिती निर्माण होऊ नये.