आमचे पंतप्रधान अमित शहा असतील; भाजप नेत्याचे खळबळजनक विधान

2

सामना ऑनलाईन । हरदोई

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्याचबरोबर खालच्या दर्जाची भाषा वापरून आणि मर्यादा सोडून केलेल्या वक्तव्यांमुळे नेते अडचणीत येत आहेत. तर काही वेळा जोशात आपण काय बोलतो आहेत हेच नेत्यांच्या ध्यानात न आल्याने त्यांची फजित उडत आहे. असाच प्रकार भाजप नेते नरेश अग्रवाल यांच्यासोबत घडला आहे. उत्तर प्रदेशातील हरदोईमध्ये भाजपचे उमेदवार जय प्रकाश यांच्या प्रचारसभेत नरेश अग्रवाल बोलत होते. त्या सभेत त्यांनी सपा आणि बसपावर सडकून टीका केली. तसेच बोलण्याच्या ओघात आमचे पंतप्रधान अमित शहा असतील, तुमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण असा सवाल त्यांनी केला. त्यांच्या या विधानाने खळबळ उडाली आहे.

समाजवादी पक्षातून अग्रवाल यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपत प्रवेश केला आहे. याआधीही अनेकदा वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते चर्चेत आले होते. आता बोलण्याच्या ओघात त्यांनी भाजपचा पंतप्रधानपदाचा उमेदवारच बदलला. सपा- बसपा आघाडी 38-38 जागांवर लढत आहे. एवढ्या जागा लढवून 543 जागांच्या लोकसभेत त्यांचे नेते पंतप्रधान कसे बनणार असा सवाल त्यांनी केला. भाजपविरोधात बनवण्यात आलेल्या महाआघाडीत प्रत्येक पक्षाचे नेते पंतप्रधान बनण्यास उत्सुक आहेत. मात्र, ते ज्या जागा लढवत आहेत. त्यातून किती जागा त्यांना मिळणार आणि मिळालेल्या जागांच्या बळावर त्यांचे नेते पंतप्रधान कसे होणार असा सवालही त्यांनी केला. ते म्हणाले अमित शहा आमचे पंतप्रधान असतील, तुमचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असा सवालही त्यांनी केला. मात्र, हा सवला करताना त्यांचा गोंधळ उडाला नरेंद्र मोदी यांच्याऐवजी त्यांनी अमित शहा यांचे नाव त्यांनी घेतले. त्यांच्या या विधानाने खळबळ उडाली आहे.

भाजपचे राज्यसभेतील खासदार डॉ. अशोक वाजपेयी यांचीही जीभ भाषणादरम्यान घसरली. भाजपचे उमेदवार जय प्रकाश यांनी विजयी करण्यासाठी सायकल चिन्हासमोरचे बटन दाबा आणि भाजपला विजयी करा. अशोक वाजपेयी आधी समजावादी पक्षात होते. त्यामुळे त्यांच्याकडून सायकल चिन्ह निघून गेले. बोलण्याच्या ओघात भाजपला विजयी करण्यासाठी सायकलसमोरचे चिन्ह दाबण्याचे आवाहन त्यांनी केले. मात्र, भाजपचे चिन्ह कमळ आहे, याचा त्यांना विसर पडला.