भाजपने एकटे पाडलेल्या अद्वय हिरे यांना शिवसेनेच्या दादा भुसेंची मदत

सामना ऑनलाईन । नाशिक

भाजपच्या दोन गटात झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेले अद्वय हिरे यांना भाजपच्याच वरिष्ठ नेत्यांनी आज वाऱ्यावर सोडले. मात्र अद्वय यांचे राजकीय विरोधक शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे यांनी अद्वय यांच्या हाकेला ओ देत त्यांना तातडीने वैद्यकीय मदत पुरवल्याने अद्वय समर्थकांनी समाधान व्यक्त केले. तर, राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपचे युवा नेते अद्वय हिरे यांना मानणारा एक मोठा गट मालेगावात आहे. भाजपचे शहराध्यक्ष सुनिल गायकवाड यांच्याशी झालेल्या मतभेदातून अद्वय यांना ही मारहाण झाल्याचे समजते.

मोदी सरकारने घेतलेल्या नोटांबदीच्या निर्णयाला बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले. विरोधकांनी हा दिवस काळा दिन म्हणून साजरा केला. याच संदर्भात मालेगावचे शहराध्यक्ष गायकवाड यांच्या समर्थकांनी नोटाबंदीसंदर्भातील संदेश अद्वय हिरे यांच्या ‘आबासाहेब समर्थक’ या भाजप समर्थकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकला. त्यातून दोन्ही गटांमध्ये जोरदार वादावादी झाली. याचाच जाब विचारण्यासाठी गेलेल्या अद्वय यांना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. याविरोधात अद्वय यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली, तर दुसऱ्या गटानेही हिरे यांच्या विरोधात तक्रार केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते.

त्यानंतर जखमी अवस्थेतील अद्वय रुग्णालयात दाखल झाले. मात्र रुग्णालयात उपचारासाठी डॉक्टर नसल्याने त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची संपर्क साधला. त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पालकमंत्र्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र मध्यरात्र झाल्याने संपर्क झाला नाही. अखेर त्यांनी शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांच्याशी संपर्क साधला व मदत मागितली. भुसे यांनी त्याला प्रतिसाद देत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अद्वय यांना तातडीने मदत उपलब्ध करून दिली.