भाजपच्या आमदारांची संख्या 121 वर, देशमुखांचा राजीनामा मंजूर

सामना प्रतिनिधी । मुंबई

विदर्भातील भाजपाचे बंडखोर आमदार डॉ.आशीष देशमुख यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी देशमुख यांचा राजीनामा मंजूर करण्यात आल्याची घोषणा सभागृहात केली.

देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे भाजप आमदारांची संख्या 121 वर आली आहे. वाटोल विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार डॉ.आशीष देशमुख हे गेल्या काही महिन्यांपासून नाराज होते. विदर्भातील तरुण आणि शेतकरी हे अतिशय हलाखीच्या अवस्थेत असून सरकार त्यांना दिलासा देण्यासाठी काहीही करीत नसल्याने देशमुख यांनी सरकारवर नाराजी व्यक्त करीत राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यासंदर्भात देशमुख यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून राजीनामा दिला होता. त्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी आज आशीष देशमुख यांचा राजीनामा मंजूर केल्याचे सभागृहात सांगितले. विशेष म्हणजे स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीवरून त्यांनी आधीही राजीनाम्याचा इशारा दिला होता.