लोकांचा विरोध असणाऱ्या खासदाराला पुन्हा उमेदवारी नाही

सामना प्रतिनिधी । मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत 16 मार्चला होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावावर चर्चा होईल. पण जनमानसामध्ये जर एखाद्या खासदाराला विरोध होत असेल तर त्या विद्यमान खासदाराचे तिकीट नक्कीच कापले जाईल असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी भाजपमधील इच्छुक उमेदवारांना दिला.

लोकसभा निवडणुकीतील नियोजनाच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर व्यवस्थापन समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी सुधीर मुनगंटीवार बोलत होते. ते पुढे म्हणाले की, भाजपच्या उमेदवारांची यादी कधी जाहीर होईल या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, 16 मार्चला नवी दिल्लीत बैठक होईल तेव्हा राज्यातील उमेदवारांच्या नावावर चर्चा होईल. त्यात कोणाचा पत्ता कापायचा याचा निर्णय पक्षाची केंद्रीय समिती घेईल, पण निवडणूक जिंकणाऱ्या उमेदवारालाच तिकीट दिले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

मित्रपक्ष अडचणीचे ठरत नाहीत
शिवसेना-भाजप युतीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, विरोधकांच्या महाआघाडीला पराभूत करण्यासाठी युती झाली आहे. कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले आहे. मित्रपक्ष अडचणीचे ठरत नाही. अडचणीत आणतात ते मित्र होत नाहीत. मित्रपक्षाच्या जागावाटपात 23 वी जागा कोणाला द्यायची ते आम्ही ठरवू, असेही मुनगंटीवार म्हणाले.