गुंडांच्या भाजपप्रवेशाचे सहकारमंत्र्यांकडून समर्थन

सामना ऑनलाईन, सोलापूर

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आयाराम गयाराम यांच्याबरोबर गुंडगिरीची पार्श्वभूमी असलेल्यांनाही उमेदवारी दिली असून या गुंडांचे समर्थन भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केल्यामुळे खळबळ उडाली.

जवळपास २२ जणांना भारतीय जनता पक्षाकडून गुंडगिरीची पार्श्वभूमी व वादग्रस्त उमेदवारांना तिकीट दिल्याने खदखद आणखी वाढली आहे. या गुंडगिरी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांचे समर्थन करताना सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, गुंडांना पक्षात घेऊन निवडून आणू आणि त्यांना सुधारण्यासाठी पक्षपातळीवर काम करून वादग्रस्त आणि गुंड प्रवृत्तीचे लोक आमच्याकडे येत असतील तर त्यांना सुधारण्यासाठी संधी आहे, असेही सांगितले. भारतीय जनता पक्षात तिकीटवाटपावरून सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री यांच्यात भडका उडालेला असतानाच सहकारमंत्र्यांनी गुंड प्रवृत्तीच्या उमेदवारांचे समर्थन करण्याची जी वक्तव्ये केली त्याच्याविरुद्ध भाजपात नाराजी व्यक्त केली जात आहे. पालकमंत्री  सुभाष देशमुख यांनी महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना हे वादग्रस्त वक्तव्य केल्याने खळबळ उडाली.