‘हिंदू आणि संघाच्या विरोधात लिहिल्यानेच, गौरी यांची हत्या’, भाजप आमदाराच्या विधानाने खळबळ

सामना ऑनलाईन । बंगळुरू

‘गौरी लंकेश या सातत्याने हिंदूंच्या आणि संघाच्या विरोधात लिहित होत्या. संघ स्वयंसेवकांच्या हत्येविरोधात आवाज उठवण्या ऐवजी त्यांनी त्यांचं समर्थन करत खिल्ली उडवली. नक्षलवाद्यांनी केलेल्या जल्लोषाचं समर्थन करणारं लिखाण त्यांनी केलं नसतं तर त्या जिवंत नसत्या?’, असा प्रश्न भाजपचे कर्नाटकमधील आमदार आणि माजी मंत्री डी. एन. जीवराज यांनी एका कार्यक्रमा दरम्यान केला. त्यांच्या या विधानामुळे खळबळ उडाली असून कर्नाटकमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. मुख्यमंत्री सिद्धरमैया यांनी अत्यंत कडक शब्दात या विधानाची निंदा केली आहे. ‘अशा प्रकारचे विधान करण्यामागे काय हेतू आहे? त्यांना असं विधान करून काय सुचवायचं आहे’, असं सिद्धरमैया म्हणाले. तसेच ‘द्वेषाचे राजकारण करण्याचा हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू’, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

कर्नाटकच्या चिकमंगलूर जिल्ह्यात कोप्पा येथे भाजपच्या युवा कार्यकर्त्यांना संबोधित करताना जीवराज यांनी हे विधान केलं. जीवराज यांच्या या भाषणाचा व्हिडिओ खासगी वृत्तवाहिनी ‘इंडिया टुडे’च्या हाती लागला असून जीवराज यांच्या अडचणी वाढणार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात येत असल्याचं जीवराज यांनी सांगितलं. गौरी यांनी संघ परिवारातील व्यक्तींच्या हत्येविरोधात आवाज उचलला नव्हता, उलट खिल्ली उडवली होती. ‘मी गौरी यांच्या आधी देखील साहित्यिक एम एम कलबुर्गी तसेच संघाच्या कार्यकर्त्यांच्या हत्येची सीबीआय तपासणी करण्याची मागणी केली होती’, असं जिवराज आपल्या समर्थनात म्हणाले.

जीवराज यांच्या या विधानाचा काँग्रेसनं तीव्र शब्दांत निषेध केला आहे. श्रृंगेरी येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी या प्रकरणी जीवराज यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच त्यांच्या विरोधात कोप्पा पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. आमदार जीवराज यांनी असं विधान का केलं? याचा तपास सुरू आहे, अशी माहिती कर्नाटकचे गृहमंत्री रामालिंगा रेड्डी यांनी आज दिली. तसेच गौरी यांच्या हत्येचा तपासही योग्य दिशेने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.