यांच्याच आता खरंच ‘राम’ राहिला नाही!

9


सामना प्रतिनिधी । मुंबई

भाजपचा ‘रावण’ पुन्हा वादात सापडला आहे. महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यभरात ‘जोडे’ खाणाऱया या रावणाने आज तर चक्क अमेरिकेत उपचार घेत असलेल्या आणि ठणठणीत असलेल्या अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला श्रद्धांजली अर्पण करून असंवेदनशीलतेचे दर्शनच घडवले. सोशल मीडियावर नेटकऱयांनी ‘रावणा’ची खिल्ली तर उडवलीच, पण सोनाली बेंद्रे यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छाही दिल्या!

भाजपचे आमदार राम कदम यांच्यातील ‘रावणा’ने अवघ्या राज्यभरात सध्या जोरदार धुमाकूळ घातला आहे. मुलगी आवडली तर तिला पळवून आणू, असे बेधडक म्हणणाऱया कदमांची ‘हंडी’ फुटली आहे. सर्वत्र निषेध, संताप व्यक्त होत आहे. कदम यांनी आज तर कहरच केला. त्यांनी सोनाली बेंद्रे हिलाच ट्विटरवर श्रद्धांजली वाहिली. नेटकऱयांनी याबाबत संताप व्यक्त करताच हे ट्विट कदमांनी हटवले खरे, पण तोपर्यंत या ट्विटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर सर्वदूर पसरला होता. नंतर संध्याकाळी कदमांनी नवे ट्विट केले आणि सोनालीच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी गेल्या दोन दिवसांपासून प्रार्थना करत असल्याचे म्हटले आहे. यांच्यात आता खरोखरच ‘राम’ राहिला नाही, हेच खरे!

घाटकोपर, बार्शी पोलिसांत अदखलपात्र गुन्हा
राम कदम यांनी महिलांबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे त्यांच्याविरोधात पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. आज घाटकोपर आणि बार्शी पोलिसांनी फक्त अदखलपात्र गुन्हय़ाची नोंद केल्याने महिलांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याविरोधात कोर्टात जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या