पत्नीचे अत्याचार सहन करणाऱ्या पुरुषांसाठी हवा ‘पुरुष आयोग’

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राष्ट्रीय महिला आयोगाच्या धरतीवर पुरुष आयोग स्थापन करण्याची मागणी भाजप खासदार हरिनारायण राजभर यांनी केली आहे. अनेक पुरुषांवर पत्नीकडून अत्याचार होत असतात. त्यांना याविरोधात आवाज उठवण्यासाठी आणि भावना व्यक्त करण्यासाठी अशा आयोगाची गरज असल्याचे ते म्हणाले. पत्नीकडून अत्याचार होणाऱ्या पुरुषांवर कोणताही अन्याय होऊ नये अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

स्त्री-पुरुष समानतेचे नारे देण्यात येतात. मात्र, महिलांवरील अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी आयोग आहे.अनेकदा पुरुषांवरील अत्याचाराच्या घटना उघड होत नाही. मात्र, अनेक पुरुषही पत्नीच्या अत्याचाराने त्रस्त आहेत. त्यांना न्याय मिळण्यासाठी देशात पुरुष आयोग स्थापन करण्याची गरज असल्याचे राजभर यांनी सांगितले. अहमदाबादमध्ये अखिल भारतीय पत्नी अत्याचारविरोधी संघ आहे. या संघाकडून अनेकदा निदर्शनेही करण्यात येतात. भाजप खासदाराने केलेली ही पुरुष आयोगाची मागणी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.