मुख्यमंत्री फडणवीस की चंद्रकांत पाटील? भाजप खासदार नाना पटोले यांचा हल्लाबोल

सामना प्रतिनिधी । कोल्हापूर

‘जो येईल त्याला मंत्री करणार’ असे आश्वासन देत सुटलेले महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे आजकाल अनेक निर्णयही घेत आहेत. त्यामुळे राज्यातील सरकारमध्ये सुसूत्रता राहिली नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत की चंद्रकांत पाटील हेदेखील समजत नसल्याचा टोला भाजपचे भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी हाणला. दरम्यान, उद्योजकांच्या कर्जमाफीसाठी पुढे येणाऱ्या सरकारचा कारभार शेतकऱ्यांबाबत चुकीचा असल्याची टीकाही त्यांनी केली.

एकीकडे भाजपचे राज्याचे प्रवक्ते मधू चव्हाण हे कोल्हापुरात येऊन सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पक्षाने केलेल्या कार्याचा उदो उदो करीत आहेत तर दुसरीकडे भाजपचेच खासदार नाना पटोले यांनी कोल्हापुरातूनच भाजपच्या कारभाराचा पंचनामा करून घरचा आहेर दिला आहे. खासदार राजू शेट्टी यांनी दिलेल्या निमंत्रणावरून २० नोव्हेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या सरकारविरोधी आंदोलनात सहभागी होणार असल्याचेही पटोले यांनी स्पष्ट केले.

पांचाळ सोनार समाजाच्या महाअधिवेशनानिमित्त रामलिंग येथे आयोजित कार्यक्रमासाठी खासदार नाना पटोले आज कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत भाजपच्या अनागोंदी कारभारावरून सरकारचे चांगलेच वाभाडे काढले. यावेळी मी लोकांच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे लढत आहे. सरकारच्या चुकीच्या कारभाराविरोधात मी बोलतच राहणार. मग पक्षाने काय कारवाई करायची ती करू दे, मला काहीच फरक पडत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

  • mahendrapadalkar

    नाना एक असंतुष्ट आत्मा. याला आमदार होऊन मंत्री व्हायचे होते.पण लोकसभेत फसला.