तिकीट कापण्याच्या भीतीने खासदार संजय धोत्रेंना हृदयविकाराचा झटका?

सामना ऑनलाईन, अकोला

भाजपचे खासदार संजय धोत्रे यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. अशी चर्चा आहे की तिकीट कापलं जाण्याच्या शक्यतेने धोत्रे यांनी धसका घेतला होता. या दडपणामुळेच त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला आहे. भाजप यंदा अकोला मतदारसंघातून नव्या चेहऱ्याला उमेदवारी देण्याची शक्यता आहे. भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची अद्याप नावे जाहीर केली नाहीयेत. नावे जाहीर होत नसल्याने आपल्याला उमेदवारी मिळणार की नाही या प्रश्नाने विद्यमान खासदारांना आणि संभाव्य उमेदवारांना ग्रासले आहे. धोत्रे हे तीनवेळा अकोला मतदारसंघातून निवडून आलेले आहेत.

राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील आणि भाजप खासदार संजय धोत्रे यांच्यात सातत्याने धूसफूस होत असते. धोत्रे यांनी पाटील यांची राज्यमंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणीही केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्ती करत दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता.

रणजित पाटील यांचे मूळ गाव असलेल्या घुंगशी इथल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पाटील विरूद्ध धोत्रे असा वाद उफाळून आला होता. या निवडणुकीमध्ये पाटील यांच्या समर्थकांनी विरोधकांच्या घरात  शिरून त्यांना मारहाण केली आणि एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप लावण्यात आला होता. पोलिसांकडे तक्रार करूनही काहीही कारवाई करण्यात न आल्याने संजय धोत्रे यांनी पोलिसांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांनी रणजित पाटील यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करत त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती.