रोज नवरे बदलणाऱ्यांना चारित्र्याचे काय कळणार? भाजप खासदाराचा सवाल

सामना ऑनलाईन । उज्जैन

राणी पद्मावती यांनी चारित्र्य आणि समाज, देशाची इभ्रत राखण्यासाठी हजारो महिलांसोबत स्वतःला अग्नीच्या स्वाधीन केले असे सांगतानाच, ‘ज्या अभिनेत्यांच्या घरातील बायका रोज नवरे बदलतात त्यांना चारित्र्याचे काय कळणार’, असा सवाल भाजपचे खासदार प्रा. चिंतामणी मालवीय यांनी आज केला. ते उज्जैन येथून लोकसभेत निवडून गेले आहेत.

‘पद्मावती’ या येत्या १ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या हिंदी चित्रपटाला विविध भागांतून विरोध होत आहे. त्याचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या विरोधात भाजप खासदार मालवीय हेसुद्धा आता मैदानात उतरले आहेत. त्यांनी सिनेकलावंतांच्या चारित्र्यावरच सवाल उठवल्याने नवा वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

राणी पद्मावती या देशासाठीच सती गेल्या. त्या वास्तवाला विकृत पद्धतीने सादर करणे हा देशाचाच अपमान आहे, असे खासदार मालवीय यांनी म्हटले आहे. अल्लाउद्दीन खिलजीच्या दरबारी कवींनी लिहिलेल्या चुकीच्या इतिहासावर संजय लीला भन्साळी यांनी ‘पद्मावती’ चित्रपट बनवला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

राजस्थानातील वितरकांचा विरोध
‘पद्मावती’ या सिनेमात इतिहासाचे चुकीचे चित्रण केले असल्याने राजस्थानातील वितरकांनीही या सिनेमाचे राइट खरेदी करण्यास नकार दिला आहे, अशी माहिती राजस्थानातील वितरक राज बन्सल यांनी दिली आहे.

भन्साळी घाबरला, व्हिडीओद्वारे दिले स्पष्टीकरण
‘पद्मावती’ चित्रपटात अल्लाउद्दीन खिलजी आणि राणी पद्मावती यांच्यावर कोणताही प्रेमप्रसंग चित्रित करण्यात आलेला नाही. या अफवा कुणी पसरवल्या हे माहीत नाही, असे स्पष्टीकरण दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी एका व्हिडीओद्वारे दिले आहे.

अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची विकृती सहन केली जाणार नाही. गौरवशाली इतिहासाचे विकृतीकरण आम्ही कदापि खपवून घेणार नाही. जनतेने ‘पद्मावती’ चित्रपटावर बहिष्कार टाकावा.
– प्रा. चिंतामणी मालवीय, भाजप खासदार, उज्जैन