बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यास राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची मारहाण

2

सामना प्रतिनिधी । नांदेड

वाईबाजार येथील सभेत आपल्या भाषणात भाजपाचे पदाधिकारी सुमीत राठोड यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्या कुटुंबीयासंदर्भात बेताल वक्तव्य केले. यामुळे संतप्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुमीत राठोड यांना मारहाण केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही गटाकडून माहूर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामुळे माहूरात संचारबंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वाईबाजार येथे भाजपाचे पदाधिकारी सुमीत राठोड यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्या कुटुंबीयासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. निवडणूक झाल्यानंतर माहूर शहरातील लक्ष्मीकांत झांमरे यांच्या घरासमोरील हनुमान मंदिर महाप्रसादाच्या कार्यक्रमात समाधान जाधवचे समर्थक आणि सुमीत राठोड यांचे समर्थक यांच्यात प्रचंड वादावादी झाली, त्यातूनच हाणामारीला प्रारंभ झाला. या हाणामारीत जखमी झालेले सुमीत राठोड यांना यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, माहूरचे नगरपंचायतीचे अध्यक्ष फिरोज दोसानी यांचे कार्यकर्ते जमले. महाप्रसादाच्या ठिकाणी त्यांची वादावादी झाली व त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुदर्शन नाईक हे देखील तेथे पोहोचले. त्यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. या हाणामारीत सुमीत राठोड हे जखमी झाले असून, शेख सज्जाद शेख अजीज हा देखील जखमी झाला आहे. निखिल जाधव यास देखील किरकोळ मार लागला आहे. या घटनेचे वृत्त समजताच व्यापाऱ्यात एकच घबराट निर्माण झाली. त्यानंतर सर्वांनी आपापली दुकाने बंद केली.

पोलीस उपअधीक्षक विजय पवार हे माहूर येथे दाखल झाले असून, राज्य राखीव दलाचे कर्मचारी देखील शहरात तैनात करण्यात आले आहेत. कौटुंबिक टिकाटिप्पणी झाल्याने हा वाद निर्माण झाला. सध्या परिस्थिती नियंत्रणात मात्र तणावपूर्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे हे घटनास्थळी पोहंचले असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.