नोटाबंदीची ‘राष्ट्रीय खिचडी’

10


निलेश कुलकर्णी

[email protected]

नोटाबंदीचा तथाकथित सर्जिकल स्ट्राइक होऊन आता वर्ष होईल. देशात जणू रामराज्यच अवतरले असा आभास त्यावेळी निर्माण करण्यात आला होता. वर्षभरानंतर ही आभासी वस्त्र गळून पडली आहेत. काळय़ा पैशांचे घबाड  बाहेर पडू शकले नाही हे विदारक वास्तव आहे. सोशल मीडियावर या निर्णयाइतकी बदनामी अन्य कोणत्याही शासन निर्णयाची झाली नाही. अर्थात, असे असले तरी सरकारची अवस्था ‘‘गिरे तो भी टांग उपरअशीच आहे. नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त विरोधी काँग्रेस पक्ष नोटाबंदीचे श्राद्ध घालायला रस्त्यावर उतरला आहे, तर सत्ताधारी पक्ष नोटाबंदीचीराष्ट्रीय खिचडीकशी रटरटली याचेच ढोल पुन्हा पिटण्याच्या तयारीत आहे.

खोटे बोल, पण रेटून बोल’ या म्हणीचा प्रत्यय केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाच्या समर्थनावरून लक्षात येतो. नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजप काळा पैसा विरोधी दिवस साजरा करत आहे तर काँग्रेसने नोटाबंदीच्या निर्णयाचे तर्पण करण्याची तयारी केली आहे. नोटाबंदीचा हा अत्यंत घिसाडघाईत घेतलेला चुकीचा निर्णय होता अशी प्रतिकिया वर्षभरात ज्यांना अर्थशास्त्र हा विषय समजतो अशा जगातील तज्ञ मंडळींनी दिली आहे. मात्र, सरकार ती अजूनही मान्य करायला तयार नाही. सरकारने नेमलेल्या रिझर्व्ह बँकेच्या गर्व्हनरांनी नोटाबंदीचा डोंगर पोखरून उंदीर काय, साधे चिलीटही बाहेर पडलेले नाही हे आकडेवारीनिशी सांगितले आहे. लोडशेडिंगच्या जमान्यात सरकार डिजिटल इंडियाची मुळाक्षरे जनतेला शिकवत आहे. हे सगळे संतापजनक आहे. नोटाबंदीने काळे पैसेवाल्यांची पुरती वाट लागली आणि देशात एक प्रकारची समानता निर्माण झाली ही मानसिकता सरकारने मोठय़ा खुबीने निर्माण केली होती. आपल्यापेक्षा अधिक श्रीमंत असणाऱयांबद्दल अनेकांच्या मनात एक प्रकारची असूया असते. ती एन्कॅश करत नोटाबंदीची फसफसलेली खिचडी गोरगरीबांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न सरकारने  केला. नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधान मोदींनी तडकाफडकी घेतल्यानंतर त्यांना त्याचे काय परिणाम  होतील याची काही कल्पना केली आहे का? असा परखड सवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला होता. अर्थात, चुका स्वीकारण्यासाठीही एक प्रकारची राजकीय दिलदारी लागते. नोटाबंदीचा निर्णय चुकला हे मान्य करण्यासाठी एखादी ‘मन की बात’ होईल काय?

लकीपंच्याहत्तरी

वयाच्या अमृत महोत्सवाची चाहूल लागली की, ‘टाक मार्गदर्शक मंडळीत’ अशी अनोखी सन्मान योजना सध्या भाजपात सुरू आहे. त्यामुळेच जनसंघाच्या काळापासून ज्यांनी गळय़ाला शबनम अडकवून चालत, सायकलवर फिरत भाजप वाढविण्याचे काम केले त्या मंडळींची आता वयपरत्वे गात्रे थकली आहेत. लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, शांताकुमार ही दिग्गज मंडळी मार्गदर्शक मंडळीत मूक दर्शकपणे काम करताना दिसतात. त्या तुलनेत अमृत महोत्सवाची चाहूल लागलेली असूनही हिमाचलचे माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल हे भलतेच ‘लकी’ ठरले आहेत. पंच्याहत्तरीच्या ऐन उंबरठय़ावर असलेल्या धुमलसाहेबांना भाजपने हिमाचलमध्ये मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बनवून  सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. म्हातारपणी मुख्यमंत्रीपदाचे बाशिंग धुमल यांना कसे काय बांधले याची खमंग चर्चा सध्या दिल्लीच्या वर्तुळात सुरू आहे. वास्तविक केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा हे पंतप्रधान व भाजपाध्यक्षांचे मुख्यमंत्रीपदाचे फेव्हरिट उमेदवार. मात्र, भाजपने घेतलेल्या सर्व्हेमध्ये नड्डांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित केल्यास हिमाचल हातातून जाईल असे धक्कादायक निष्कर्ष आल्याने पक्षाला प्रेमकुमारांना नाइलाजाने बोहल्यावर चढवावे लागत आहे. गंमतीचा भाग म्हणजे याच राज्याचे माजी मुख्यमंत्री असणारे अत्यंत निःस्पृह नेते शांताकुमार यांना पंच्याहत्तरीचे निमित्त सांगून भाजपने केव्हाच अडगळीत टाकले आहे. आता वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केल्यानंतर धुमल मुख्यमंत्री झाले तरी पायउतार होतील व नड्डा सिंहासनावर चढतील असा लंगडा युक्तिवाद भाजप करत आहे. पण ‘‘बुढ्ढा होगा तेरा बाप’’ असे म्हणत भल्या भल्या तरुण स्पर्धकांना मागे टाकत धुमल यांनी बाजी मारल्याने सध्या मार्गदर्शक मंडळात दिवाळीनंतर फटाके फोडले जात आहेत म्हणे..!

तू मेरे सामनेमै तेरे सामने!

राजकारणात मतभेद असावेत. मात्र, मनभेद असू नयेत असे नेहमीच म्हटले जाते. दक्षिणेकडील काही राज्यांचा अपवाद आणि मायावती- मुलायमसिंगांमधील संघर्ष सोडला तर हिंदुस्थानच्या राजकारणाला कधी व्यक्तिद्वेषाचे गालबोट लागले नाही ही जमेची बाजू मानावी लागेल. राजकारणात दोन द्यायचे आणि दोन घ्यायचे ही तयारी नेहमीच ठेवावी लागते. मात्र राजकारणापलीकडे एक प्रकारचे नाते असते याची अनेक उदाहरणे आहेत. आपले पारंपरिक प्रतिस्पर्धी राम मनोहर लोहिया यांना पंडित नेहरूंनी अखेरच्या दिवसांमध्ये केलेली मदत असो की आणीबाणीनंतर जनता सरकार आल्यानंतर दस्तुरखुद्द जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधींची भेट घेऊन ‘‘तुम्हाला काही होऊ देणार नाही’’ असा दिलेला वडीलकीचा दिलासा असो. सोनिया गांधी आणि अटलजी, सोनिया आणि प्रमोद महाजन यांच्यातील सौहार्दाच्या आठवणी अजूनही जागविल्या जातात. याचे कारण म्हणजे नजीकच्या काळात राजकीय नेत्यांमध्ये वाढलेली कटुता. नुकताच सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये कार्यक्रम झाला. इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी असल्याने या कार्यक्रमाला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीही उपस्थित होते. सोनिया आजारपणामुळे अनुपस्थित होत्या. मात्र, या संपूर्ण कार्यक्रमात मोदी व राहुल यांचे संबंध कमालीचे ताणलेले असल्याचे दिसून आले. साधा नमस्कार चमत्कार नाही की ‘हाय हॅलो’ नाही. पक्षीय राजकारणापासून अलिप्त असलेली पदे म्हणून ओळखल्या गेलेल्या लोकसभा व राज्यसभेच्या सभापतींनीही राहुल गांधी येताच आपल्या माना मागे वळवल्या. त्याचे फोटो व्हायरल झाल्याने ही राजकीय कटुता जगासमोर आली. गुजरातच्या निवडणुकीत राहुल यांनी त्रेधातिरपीट उडवली असली तरी तो राजकारणाचा भाग आहे. त्याचा त्रागा असा सार्वजनिक समारंभातून निघू नये. आमनेसामने मनभेदाच्या तलवारी न उपसण्याची खबरदारी दोन्ही पक्षांनी घेतलेली बरी.

आपली प्रतिक्रिया द्या