गोव्यात मोठे फेरबदल; डिसोझा-मडकईकरांना हटवले, नाईक-काब्राल नवे मंत्री

1

सामना प्रतिनिधी । पणजी

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या गैरहजेरीत राजभवनात पार पडलेल्या छोटेखानी सोहळ्यात कुडचडेचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष नीलेश काब्राल आणि मुरगावचे आमदार तथा अनिवासी भारतीय आयुक्त मिलिंद नाईक यांनी सोमवारी मंत्रीपदाची शपथ घेतली. मिलिंद नाईकांकडे नगरविकास तर काब्राल नवे वीज मंत्री देण्यात आले आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासह वीजमंत्री पांडुरंग मडकईकर आणि नगर विकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या आजारपणामुळे विरोधकांनी आजारी सरकार अशी टीका करत प्रशासकीय कारभार ठप्प झाल्याचा आरोप करत सरकारला घेरले होते.

तिसऱ्यांदा अमेरिकेतून उपचार घेऊन आल्या नंतर देखील मुख्यमंत्री पर्रिकर मंत्रालयात येऊन आपले काम करू शकत नव्हते. दरम्यानच्या काळात कांदोळी येथील दुकले हॉस्पिटल मध्ये 4 दिवस उपचार घेऊन सुद्धा प्रकृतीत अपेक्षित सुधार होत नसल्याने पर्रिकर यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडे पद सोडण्याची इच्छा बोलून दाखवली होती.त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार खास विमानाने पर्रिकर यांना दिल्ली येथील एम्स मध्ये दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पर्रिकर यांनी पद सोडण्याची इच्छा दाखवल्या नंतर शहा यांनी रामलाल,बी.एल. संतोष आणि विजय पुराणिक या तिघांना निरीक्षक म्हणून गोव्यात पाठवून राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला होता. निरीक्षकांनी दिलेल्या अहवालावर तिन्ही खासदारां सोबत निरीक्षकांच्या उपस्थितीत चर्चा केल्यानंतर काल शहा यांनी ट्वीट करत पर्रिकर हेच मुख्यमंत्री पदी कायम राहतील असे कळवले होते. त्यानंतर सोमवारी डिसोझा आणि मडकईकर यांना आजारपणाच्या कारणास्तव हटवून त्यांच्या जागी काब्राल आणि नाईक यांची मंत्री मंडळात वर्णी लावली.

डिसोझा यांना मंत्रीमंडळामधून हटवण्याचा निर्णय रुचलेला नाही. याबद्दल त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली असून एकनिष्ठ राहिल्याचे हेच फळ काय असा सवाल भाजपला केला आहे. दरम्यान प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी डिसोझा पक्षाचे वरिष्ठ नेते असून ते पक्षाची प्रतिमा बिघडेल असे कोणतेही कृत्य करणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली असली तरी डिसोझा यांना वगळल्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. खातीवाटप आणि मंत्री मंडळ फेररचनेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे गोवा प्रभारी बी.एल. संतोष आणि विजय पुराणीक गोव्यात दाखल झाले आहेत. दोघांनी शनिवारी शपथविधी सोहळ्याला देखील हजेरी लावली आहे. घटक पक्षांना विश्वासात घेऊन मुख्यमंत्री पर्रिकर हेच खातेवाटप आणि फेर रचने बाबत अंतिम निर्णय घेतील,असे तेंडुलकर यांचे म्हणणे आहे.

मडकईकर आणि डिसोझा हे उत्तर गोव्यातील मंत्री होते. त्यांना वगळल्याने उत्तर गोव्यातील 2 मंत्री कमी होऊन नाईक आणि काब्राल यांच्या रूपाने दक्षिण गोव्यातील 2 मंत्री वाढले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला दक्षिण गोव्याची जागा जड जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन मंत्र्यांच्या रुपात भाजपची ताकद वाढवण्याबरोबर घटक पक्षांना पर्रिकर यांच्याकडील अतिरिक्त खाती वाटून त्यांची साथ लोकसभा निवडणुकी वेळी मिळवणे हे ध्येय बाळगुन भाजपने पावले टाकली असल्याचे मानले जात आहे. मंत्रीमंडळ फेरबदल आणि खाती वाटप आठवड्या भरात होईल अशी शक्यता, प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी व्यक्त केली आहे.