राष्ट्रवादीच्या मुळावर घाव घालण्यासाठी बारामतीत आलोय, अमित शहा यांचा पवारांवर हल्ला

1
amit-shah-attack-

सामना ऑनलाईन । बारामती

लोकसभेची यंदाची लढाई महत्त्वाची असून राष्ट्रवादीच्या मुळावर घाव घालण्यासाठीच मी पवारांच्या बारामतीत आलोय, अशा शब्दांत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर जोरदार हल्ला चढवला. बारामती लोकसभा मतदार संघातील निवडणूक मैत्रीपूर्ण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

देशात सर्वत्र फिरताना प्रत्येक भागात ‘मोदी-मोदी’ असाच आवाज ऐकू येत आहे. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत देशात परिवर्तन करण्याचे काम केले. विकासाची अनेक कामे देशभरात केली आहेत. सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे त्यांनी राजकारणातील घराणेशाही मोडीत काढली. घराणेशाहीच्या राजकारणात देशाचा कधीच विकास होऊ शकत नाही. त्यामुळेच बारामतीची लढाई मोठ्या हिमतीने भाजपा लढत असल्याचे अमित शहा यांनी सांगितले. बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते.

देशात पाच पिढ्या व 55 वर्षे राजकारण करणाऱ्या काँग्रेसच्या गांधी परिवाराला गरिबी हटवणे जमले नाही. नरेंद्र मोदी यांनी गरिबी पाहिली व अनुभवली आहे. त्यामुळे तेच या देशातील गरिबी खऱ्या अर्थाने दूर करू शकतात. काँग्रेसबरोबर सत्तेत असणाऱ्या शरद पवार यांनी राज्याचा काय विकास केला, असा प्रश्न त्यांनी केला. हा देश घराणेशाहीच्या राजकारणातून मुक्त करून देशाचा विकास करण्यासाठी, मोदींना पंतप्रधान करण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी केले.

पवार देशाचे कृषी मंत्री असताना कच्ची साखर आयात करत होते. केंद्रात भाजपचे सरकार आल्यावर मोदींनी ही आयात थांबवण्याचा निर्णय घेतला. त्याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना झाला. इथोनॉलचे दर वाढवून दिल्याने कारखानदारी बळकट झाली. पाच वर्षांत भाजप सरकारने काय दिले याचा हिशेब आम्ही दिलाय. पवार व त्यांच्या साथीदारांनी शेतकऱ्यांसाठी काय केले हे सांगावे, असे शहा म्हणाले. निवडणुकीनंतर पुरंदर विमानतळाचे काम तातडीने मार्गी लावण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या वेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर, राज्यमंत्री विजय शिवतारे, बारामती मतदार संघाच्या उमेदवार कांचन कुल, खासदार संजय काकडे, पुणे भाजप अध्यक्ष आमदार बाळा भेगडे, माधुरी मिसाळ, बाबुराव पाचर्णे, राहुल कुल, शरद सोनवणे उपस्थित होते.