भाजप सरपंचाने दिवाळीआधीच ‘दिवे’ लावले, दिवाळीसाठी 18 मिठाईचे बॉक्सची केली मागणी

1

योगेश चांदेकर । वाणगाव

‘ना खाऊंगा.. ना खाने दुंगा’ अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र डहाणू तालुक्यातील भाजपच्या महिला सरपंचाने ‘खाऊंगी और खाने भी दुंगी’ असा नारा दिला आहे. दिवाळी जवळ आल्याने मिठाईचे 18 बॉक्स पाठवा, अशी लेखी मागणी त्यांनी वाडीमालक व शिवसेनेचे पालघर विधानसभा संपर्कप्रमुख रमाकांत रात यांच्याकडे केली असून ही ‘गोड’ मागणी ग्रामीण भागात चर्चेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीच्या लेटरहेडवरच अशा प्रकारची मागणी केली असून दिवाळीच्या आधीच ‘दिवे’ लावणार्‍या या महिला सरपंचाचे नाव पार्वती गिंभल असे आहे.

डहाणू पंचायत समितीअंतर्गत डेहणे-पळे ही ग्रामपंचायत असून तेथे पूर्वी सीपीएमची सत्ता होती. आता भाजपचा वरचष्मा आहे. ग्रामपंचायतीच्या विकासासाठी आपल्या पदाचा व लेटरहेडचा वापर करणे अपेक्षित आहे. मात्र पार्वती गिंभल या सरपंचाने दिवाळीसाठी मिठाई मिळवण्याकरिता आपल्या पदाचा तसेच लेटरहेडचाही उपयोग केल्याने डहाणू तालुक्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

15 ऑक्टोबर रोजी पार्वती गिंभल यांनी वाडीमालक रमाकांत रात यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, ‘आपणास विनंती करते की, 5-11-2018 पासून दीपावली चालू होत असून त्या कामी ग्रामपंचायतीस आपल्याकडून 18 बॉक्स मिठाई मिळावी ही विनंती.’ अन्य वाडीमालकांकडेदेखील गिंभल यांनी अशाच प्रकारची पत्रे पाठवली असून ही मिठाई नेमकी कोणासाठी हवी आहे व एवढ्या मिठाईचे करणार तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.  

जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करणार

आपल्या पदाचा गैरवापर करून अशा प्रकारे मिठाईची मागणी करणे अत्यंत चुकीचे आहे. त्याकरिता लेटरहेडचा वापर करणे हीदेखील गंभीर बाब असून याप्रकरणी आपण जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांच्याकडे लेखी तक्रार करून पार्वती गिंभल यांचे सरपंचपद रद्द करण्याची मागणी करणार असल्याचे रमाकांत रात यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना सांगितले. दरम्यान सदर प्रकरण वरिष्ठ अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून देऊ, असे डेहणे-पळे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र पाटील यांनी म्हटले आहे.