इंधन दर वाढीवर सरकार काही करू शकत नाही : भाजप

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सामान्य जनता महागाईने त्रस्त आहे पण त्यांचा बंदला पाठिंबा नाही असे स्पष्टीकरण देत केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी इंधन दर वाढीवर सरकार काही करू शकत नसल्याचे म्हटले आहे. जनता त्रस्त आहे, आम्ही त्यांच्या सोबत आहोत, महागाई कमी करण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेते ते बोलत होते.

रवी शंकर प्रसाद माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “ज्या देशात पेट्रोल उत्पादन होते तिथे पेट्रोलियम उत्पादनांना काही सीमा आहेत, वेनेझुएलामध्ये राजकीय अस्थिरता आहे, इराण आणि इराकही अस्थिरतेच्या गर्तेत आहे. आमचे सरकार महागाई कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून त्यात आम्हाला यशही मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेसने पुकारलेल्या हिंदुस्थान बंद बद्दल बोलताना म्हणाले की, “लोकशाहीत आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण लोकशाहीत हिंसेच्या माध्यमातून राजकारण करणे कितपत योग्य आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

बिहारमध्ये बंद दरम्यान झालेल्या मुलीच्या मृत्यूबद्दल त्यांनी दुख व्यक्त केले आणि याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला. “लोकशाहीत कुठल्याही आंदोलनादरम्यान इस्पितळे, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवा चालू राहतात. पण दोन वर्षाच्या मुलीच्या मृत्यूमुळे देशात अस्वस्थेचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न चालू असल्याची टीका त्यांनी केली. बंद यशस्वी नाही झाला म्हणून काँग्रेस पक्षाने हिंसा करून नागरिकांमध्ये भिती पसरवली असून याचा निषेध त्यांनी नोंदवला.