पुलांच्या दुर्घटनांसाठी पादचारी जबाबदार, भाजप प्रवक्त्याचं वादग्रस्त वक्तव्य

सामना ऑनलाईन । मुंबई

गुरुवारी मुंबईच्या सीएसएमटी स्थानकाजवळचा हिमालय पुलाचा काही भाग कोसळला आणि सहा जण मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेनंतर एका भाजपच्या प्रवक्त्याने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. रस्त्यावर चालणाऱ्या लोकांमुळेच अशा प्रकारच्या पूल दुर्घटना होतात असं वादग्रस्त भाजप प्रवक्त्या संजू वर्मा यांनी केलं आहे.

एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात संजू यांनी हे वक्तव्य केलं आहे. या कार्यक्रमाच्या निवेदकांशी बोलताना आधी संजू यांनी ही दुर्घटना म्हणजे नैसर्गिक संकट असल्याचं म्हटलं. त्यानंतर त्यांनी पूल कोसळण्यासाठी सरकार जबाबदार नाही. तर रस्त्यावरून चालणारे नागरिक जबाबदार असल्याचं म्हटलं. संजू वर्मा एवढं बोलून थांबल्या नाहीत, तर त्यांनी यासाठी एक उदाहरणही सांगितलं. 29 सप्टेंबर 2017 रोजी झालेली एलफिन्स्टन दुर्घटनाही लोकांमुळेच झाली होती. तेव्हाही लोकांना पुलावर जाण्यापासून मनाई करण्यात आली होती. तरीही लोक तिथे गेले आणि ती भयंकर दुर्घटना झाली, असं अजब तर्कट त्यांनी आपल्या वक्तव्यातून मांडलं. वर्मा यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.

एकिकडे या दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सर्वांनी शोक व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे अशा प्रकारचं वक्तव्य हे अत्यंत दुर्दैवी असल्याचा सूर या टीकेत पाहायला मिळत आहे.