भाजपमध्ये शिरू पाहणाऱ्या काँग्रेसच्या 10 आमदारांच्या गटाला नकार, प्रदेशाध्यक्षांचा गौप्यस्फोट

182
neta-symbolic

सामना प्रतिनिधी । पणजी

काँग्रेस पक्षाच्या दहा आमदारांचा गट भाजपमध्ये विलीन होण्यास तयार होता मात्र आमच्या पक्ष श्रेष्ठींनी त्याला मान्यता दिली नाही. आम्हाला कोणताच पक्ष अस्थिर करायचा नाही, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी बुधवारी केला.

काँग्रेसचे आमदार फोडण्यासाठी बरेच कोटी रुपये भाजपने आमदारांना देऊ केले आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी नुकताच केला होता. आमच्याकडे रेकॉर्डिंगही आहे, असा दावा चोडणकर यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर बोलताना तेंडुलकर म्हणाले, चोडणकर हे काहीही आरोप करत आहेत. त्यांनी रेकॉर्डिंग असल्यास जाहीर करावे. रेकॉर्डिगमधील आवाज कुणाचा ते तरी कळून येईल.

ज्यावेळी सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे काँग्रेसमधून भाजपमध्ये आले तेव्हा देखील पैशांचा व्यवहार झाला नव्हता. आता कोणत्याही भाजप नेत्याने काँग्रेसच्या कुठच्याच आमदाराशी चर्चा देखील केलेली नाही. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारकडे एकूण तेवीस आमदारांचे संख्याबळ आहे आणि तेवढे संख्याबळ स्थिर सरकारसाठी एकदम पुरेसे आहे,असे तेंडुलकर म्हणाले.

पंधरा दिवसांपूर्वी काँग्रेसच्या दहा आमदारांचा गट भाजपमध्ये विलीन होण्यास तयार झाला होता. आम्ही व भाजपच्या केंद्रीय नेत्यांनीही यास मान्यता दिली नाही. चोडणकर यांचे काँग्रेसच्या कुठच्याच आमदारावर नियंत्रण राहिलेले नाही. काँग्रेसचे आमदार सैरभैर आहेत. कारण त्यांना ठाऊक आहे, की देशात आणि गोव्यातही पुढील पंचवीस वर्षे भाजपचीच सत्ता राहणार आहे. आम्हाला गोवा सरकार स्थिर ठेवायचे आहे व त्यासाठी काँग्रेसच्या आमदारांना आम्ही भाजपमध्ये घेण्याचा प्रश्नच येत नाही. फ्रान्सिस सिल्वेरा किंवा क्लाफास डायस हे जी वक्तव्ये करत आहेत, त्यांना आम्ही रोखू शकत नाही पण आम्ही पक्षात कुणाला घेणार नाही, असेही तेंडुलकर यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या