मोदींच्या सभेला जाणाऱ्या भाजप समर्थकांचा पोलिसांवर हल्ला, रॉड-चपलेने मारहाण

सामना ऑनलाईन । कोलकाता

पश्चिम बंगाल येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावेळी भाजप समर्थकांनी पोलिसांना मारहाण केल्याचं समोर आलं आहे. बसमधून आलेल्या भाजप समर्थकांना चालत जाण्यास सांगितल्याने संतापलेल्या समर्थकांनी पोलिसांवर हल्ला करत चप्पल आणि रॉडने मारहाण केली.

सोमवारी मिदनापूर येथे झालेल्या सभेवेळी हा प्रकार घडला. सभेच्या ठिकाणी जाण्यासाठी भाजप समर्थकांचे जथ्थेच्या जथ्थे बसमधून आले होते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या बसेस स्थळापासून काही अंतरावर थांबवण्यात आल्या आणि पोलिसांनी समर्थकांना चालत जाण्यासाठी सांगितलं. पोलिसांनी असं सांगितल्यामुळे संतापलेल्या समर्थकांनी पोलिसांना मारहाण करायला सुरुवात केली. चप्पल, रॉडने मारहाण करत केसांना पकडून फरफटतही नेण्यात आलं. तसंच या समर्थकांनी तिथे उपस्थित असलेल्या स्थानिक स्वयंसेवकांवरही हल्ले करायला सुरुवात केली. या घटनेत जवळपास १२ हून अधिक पोलीस जखमी झाले. त्यांना त्वरित स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

या घटनेनंतर पश्चिम बंगालचे भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांना इतकी गर्दी आवरता येत नव्हती. बस थांबवलेल्या ठिकाणापासून गर्दीचा ओघ पुढे न गेल्यामुळे पक्षाच्या समर्थकांनी निदर्शनं करायला सुरुवात केली. या घटनेत पोलिसांनीही समर्थकांशी चांगली वर्तणूक केली नाही. पण ही घटना निश्चितच वाईट आहे, असं घोष यांचं म्हणणं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनीही घटनेची माहिती मिळाल्याचं सांगितलं असलं तरी या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.