वाल्याचे ‘वाल्मिकी’ जरूर करा पण पक्षच ‘वाल्या’ होऊ नये याची काळजी घ्या!

सामना प्रतिनिधी । जळगाव

पक्षाने गरजेपुरता माझा वापर केला असे सडेतोड मत भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज भुसावळ येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. वाल्याचा वाल्मिकी जरूर करा पण पक्षच वाल्या होवू नये, याची काळजी घ्या असा सनसनित टोलाही खडसे यांनी भाजपाला लगावला.

खासदार रक्षा खडसे यांनी आयोजित केलेल्या बहिणाबाई महोत्सवाच्या तयारीनिमित्त भाजपा नेते आमदार एकनाथ खडसे आज भुसावळ येथे आले होते. त्यावेळी खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी मंत्री खडसे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, 40 वर्षे पक्षाची सेवा केल्याचे बक्षीस मला मिळाले आहे. गरज होती तेव्हा पक्षाने वापर करून घेतला आहे. खडसे पुढे म्हणाले की, पक्षाने वापर करून घेतला तरी दिव्याची वात मजबूत असून अंधार पडला की दिव्याची वात पेटून प्रकाश देते.

धुळे मनपा निवडणुकीत पक्षाने काही गुंडांना प्रवेश देऊन उमेदवारीही दिली, याबाबत विचारले असता एकनाथ खडसे म्हणाले, पक्षाने वाल्याचा वाल्मिकी जरूर करावा पण लक्षात ठेवा पक्षच वाल्या बनू नये याची काळजी घ्यावी, असा स्पष्ट सल्लाही त्यांनी दिला. मी सत्तेसाठी लाचार नसून सत्ता आणणाऱ्या मधून आहे. रामालाही वनवासात जावे लागले होते. मात्र समय बलवान आहे. पक्षाच्या विरोधात काम करणार नसल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे खरे बोलले
‘सामना’च्या अग्रलेखातून एकनाथ खडसे यांना भाजपाने बाजूला सारल्याचा उल्लेख करण्यात आला होता. याबाबत विचारल्यावर खडसे म्हणाले की, ‘सामना’च्या अग्रलेखातील मताशी सहमत असून उद्धव ठाकरे खरे बोलले आहेत.