कर्नाटकात भाजपा सत्तेवर येणार नाही, निवडणूकपूर्व सर्वेक्षणाद्वारे भाकीत

सामना ऑनलाईन । बंगळुरू

पुढच्या वर्षी कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका आहेत, या निवडणुकीमध्ये भाजपाला सत्तेपर्यंत पोहोचता येणार नाही आणि काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेत येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सी-फोर या संस्थेने निवडणुकीच्या एक वर्ष आधी सर्वेक्षण केलं आहे, त्याद्वारे हा दावा करण्यात आला आहे. या निवडणुकीत काँग्रेसला १२० ते १३२ जागा मिळतील असंही भाकीत वर्तवण्यात आलं आहे. तर भाजपाला ६० ते ७० जागांवर समाधान मानावं लागेल असं सांगण्यात येत आहे.

कर्नाटकातील राजकारण्यांबाबत केलेल्या सर्वेक्षणात तिथल्या ४६ टक्के जनतेने सध्याचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांना पसंती दिली आहे. त्याखालोखाल माजी मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांना २७ टक्के लोकांना पसंती दर्शवली आहे. भाजपाचे नेते या सर्वेक्षणावर टीका करायला लागले आहेत. तिथले प्रवक्ते एस.सुरेशकुमार यांनी हा सर्वेक्षण अहवाल आत्ताच का मांडण्यात आला असा प्रश्न विचारला आहे.