सत्तेत आल्यास हैद्राबादचे नामकरण भाग्यनगर करू : भाजप आमदार

4

सामना ऑनलाईन । हैद्राबाद

जर भाजप तेलंगाणात निवडणूक जिंकले तर हैद्राबादचे नाव बदलून भाग्यनगर करू असे वक्त्यव्य भाजप आमदार राज सिंह यांनी केले आहे. तसेच सत्तेत आल्यास सिकंदराबाद आणि करीमनगरचेही नाव बदलू असेही त्यांनी यावेळी सांगितले.

एनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सिंह म्हणाले की, “हैद्राबादचे पूर्वीचे नाव हे भाग्यनगर होते, १५९० साली जेव्हा कुतुबशाह या भाग्यनगरमध्ये आला तेव्हा त्याने या शहराचे नाव हैद्राबाद केले. हिंदूं समुदायावर हल्ले केले, मंदिरे उध्वस्त केली. हैद्राबादचे नाव बदलण्याची तयारी आम्ही केली आहे. तेलंगाणात जर भाजपची सत्ता आली तर राज्याचा विकास ही आमची प्राथमिकता असेल आणि दुसरी प्राथमिकता हैद्राबादचे नाव बदलून भाग्यनगर करणे असेल. तसेच सिकंदराबाद आणि करीमनगरचेही नाव बदलू.”

जी जी नावं मोगलांनी आणि निजांनी ठेवली आहेत, ती सर्व बदलली जातील असेही सिंह यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आधी अलाहबादचे नाव प्रयागराज केले होते. तसेच फैजाबादचे नावही अयोध्या करण्याची घोषणा योगींनी केली होती. तर अहमदाबादचे नाव कर्णावती करता येईल असा विचार गुजरातचे उपमुख्यमंत्री यांनी बोलून दाखवला होता.