नागपूर-गोंदिया जिल्ह्यांत भाजपची सरशी, ‘विदर्भ माझा’नेही खाते उघडले

सामना ऑनलाईन । नागपूर

नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या चौथ्या व अंतिम टप्प्यातील नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीची मतमोजणी सकाळपासून सुरू आहे. मतमोजणीच्या पहिल्याच टप्प्यात रामटेक आणि उमरेड नगरपरिषदेवर भाजपची सत्ता आल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र ‘विदर्भ माझा’ने पहिल्याच प्रयत्नात भाजपला टक्कर देत काटोलमध्ये सत्ता सगळ्यात जास्ती जागा आपल्या खिशात टाकल्या आहेत. त्यामुळे भाजपला मोठा फटका बसला असून विदर्भात घट्ट पाय रोवण्याच्या स्वप्नाला तडा गेला आहे.

मतदान झालेल्या ११ नगरपरिषदांमध्ये नागपूर जिल्ह्यातील ९ आणि गोंदिया जिल्ह्यातील २ नगरपरिषदांचा समावेश होता. काटोल मध्ये ४ जागांवर विदर्भ माझा पक्षाने विजय मिळवला असून तर ३ जागांवर या पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. नगराध्यक्षपदासाठीही विदर्भ माझाच्या उमेदवार वैशाली ठाकुर आघाडीवर आहेत.

उमरेड मध्ये ८ पैकी ५ ठिकाणी भाजपला यश आले तर ३ ठिकाणी काँग्रेस उमेदवार विजयी झाले आहेत. उमरेड नगर पालिका निवडणुकीत प्रभाग ३ (अ)मधून विशाल देशमुख (काँग्रेस), ३ (ब) अरुणा हजारे (भाजप), ४ (अ) योगिता इटनकर (काँग्रेस), ४(ब) सुरेश चिचमलकर (काँग्रेस) विजयी झाले आहेत.

रामटेकच्या एकूण १७ जागांपैकी १३ जागांवर भाजपा, तर शिवसेना आणि काँग्रेस प्रत्येकी २ जागांवर विजयी झाले आहेत. नगराध्यक्षपदी भाजपाचे दिलीप देशमुख निवडून आले आहेत. सावनेरच्या ८ पैकी ३ जागावर काँग्रेस आणि ५ जागावर भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत.

या शिवाय कळमेश्वर नगरपालिका – भाजपा, मोहपा नगरपालिका – काँग्रेस, सावनेर नगरपालिका – नगराध्यक्ष रेखाताई मोवाडे भाजपा, तिरोडा नगरपालिका – सोनाली देशपांडे भाजपा यांची निवड झाली असून काही ठिकाणी मतमोजणी सुरू आहे.