चंद्रपूर महापालिकेत भाजपला बहुमत

सामना ऑनलाईन । नागपूर

चंद्रपूर महापालिकेत भाजपने स्पष्ट बहुमत घेत एकहाती सत्ता संपादन केली आहे. चंद्रपूर महापालिकेच्या ६६ सदस्यांच्या सभागृहात भाजपने ३६ जागा जिंकल्या आहेत.

काँग्रेसला गटबाजीचा फटका बसला. त्यांना फक्त १२ जागांवर समाधान मानावे लागले. माजी खासदार नरेश पुगलिया आणि विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार यांच्यातील मतभेदांमुळे अखेरपर्यंत काँग्रेसच्या उमेदवारांची यादी पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली.

अर्थमंत्री सुधार मुनगंटीवार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या संघटनात्मक डावपेचांमुळे पहिल्यांदाच भाजपने एकहाती सत्ता संपादन केली. मागील निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळविला होता. परंतु काही वर्षांनी भाजपने काँग्रेसचे नगरसेवक फोडून सत्ता हस्तगत केली होती. यावेळी भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.

कमळ फुलले

१७ प्रभागातील ६६ जागांसाठी ४६० उमेदवार या निवडणुकीत उतरले होते. भाजपासह काँग्रेसनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविली होती. केंद्रात, राज्यात आणि जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता असल्याने शहराचा विकास करण्यासाठी भाजपाच्या हाती सत्ता सोपवा असे आवाहन करीत भाजपाच्या दोन्ही मंत्र्यांनी प्रचारात उडी घेतली होती. तर, मालमत्ता करातील अवाजवी करवाढीचा मुद्दा घेवून काँग्रेसने माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात या निवडणुका लढल्या होत्या. भाजपा आणि काँगेसच्या उमेदवारांमध्ये अनेक ठिकाणी झालेल्या काटय़ाच्या लढतीमध्ये भाजपाने बाजी मारली आहे. त्यामुळे काँग्रसला विरोधी पक्षाची भूमिका बजवावी लागणार आहे.

या वेळची निवडणूक सर्वार्थाने गाजली. मागील महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसची साथ सोडून भाजपाला मदत करणाऱया १२ नगरसेवकांना तिकीटा द्यायच्या की नाही या मुद्यावरून प्रचंड ओढाताण झाली. अखेर १२ पैकी फक्त तीन नगरसेवकांना आणि दोघांच्या पत्नीला तिकीटा देवून तडजोड करण्यात आली होती. रामू तिवारी यांना तिकीटात डच्चू मिळाल्याने ऐनवेळी त्यांनी भाजपाकडून तिकीट मिळविले.

गेल्या वेळच्या १६ जागांवरून भाजपाने ३६ जागांवर मुसंडी मारली आहे. विद्यामन महापैर राखी कंचर्लावार आणि त्यांचे पती संजय कंचर्लावार हे दोघेही भाजपाच्या तिकीटावर निवडून आले आहेत. तर, इंडस्ट्रियल इस्टेट प्रभागातील चारही जागासह बसपाने आठ जागांवर विजय मिळवून सर्वांचे लक्ष वेधले आहे. प्रहार संघटनेचे पप्पू देशमुख यांनी काँग्रेसचे कुशल पुगलिया यांचा पराभव केला. काँग्रेसचे नगरसेवक २६ वरून एकदम १२ वर घसरले आहेत. चंद्रपूरच्या राजकारणात काँग्रेसची प्रथमच एवढी मोठी घसरण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने १७ जागांवर उमेदवार उभे केले होते. मागील टर्ममध्ये या पक्षाचे चार नगरसेवक होते. मात्र या वेळी ही संख्या दोनवर आली आहे. अभ्यासू नगरसेवक अशी ओळख असलेले संजय वैद्य यांचाही पराभव झाला. शिवसेनेने आमदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वात चंद्रपूर विधानसभा प्रमुख किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारात या निवडणुका लढल्या. शिवसेनेचे पाच नगरसेवक होते. मात्र या निवडणुकीत सेनेला तीन नगरसेवक गमवावे लागले आहेत. मनसेच्या मात्र दोन जागा मिळाल्या आहेत. तीन अपक्ष नगरसेवकही निवडून आले आहेत.

भाजपाने निर्विवाद बहुमत मिळविले असले तरी महापौरपद कोणाला मिळणार हे अद्याप स्पष्ट केले नाही. या वेळी येथील महापौरपदाचे आरक्षण महिला खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे. विद्यमान महापौर राखी कंचर्लावार यांच्यासह अंजली घोटेकर यांची नावे या पदासाठी चर्चेत आहेत. असे असले तरी पक्षाकडून अधिकृतपणे कुणाच्याही नावासाठी दुजोरा मिळालेला नाही.

पक्षीय बलाबल (एकूण जागा ६६)

भाजप- ३६

कॉंग्रेस- १२

बसप- ८

राकॉं- २

शिवसेना- २

मनसे- २

प्रहार- १

अपक्ष- ३