‘माझे सोयाबीन परत द्या’, भाजपच्या अच्छे दिनावर कार्यकर्त्याचा खराब शेरा

4

सामना प्रतिनिधी । हिंगोली

’अच्छे दिन’चा नारा देत केंद्र आणि राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपच्या एका जेष्ठ कार्यकर्त्यावर बुरे दिन आले आहेत. हमी भाव योजनेंतर्गत शासकीय शेतमाल खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या सोयाबीनची देय रक्कम ३ महिन्यापासून मिळाली नसल्याने ‘माझे सोयबिन परत द्या’, अशी मागणी हिंगोली येथील भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते बाबाराव नारायणराव घुगे यांनी केली आहे. सोयाबीनचे पैसे अथवा सोयाबीन मिळाले नाही तर ग्राहक मंचात दाद मागणार असल्याचेही घुगे यांनी सांगितले.

‘मी अल्पभुधारक शेतकरी असून खरेदी-विक्री संघात माझ्या नावाची नोंद केली आहे. ८ नोव्हेंबर २०१७ रोजी शेतमाल विक्रीसाठी ९ नोव्हेंबर रोजी घेऊन यावा, असा संदेश मोबाईलवर आला. त्यानुसार सोयाबीन विक्रीसाठी घेऊन गेलो. शेतमालाची आद्रता ९ टक्के ऐवढी होती. त्यानंतर सोयाबीनची चाळणीद्वारे सफाई करुन ३ हजार ५० रुपये क्विंटल प्रमाणे विक्री केली. ३४ डागाचे ७०० रुपये घेण्यात आले असून ते नियमबाह्य आहे. विक्री केलेल्या सोयाबीनचे पैसे मिळण्यासाठी अनेक वेळा कार्यालयात हेलपाटे मारले. परंतु, २९ जानेवारी २०१८ पर्यंत सोयाबीनचे पैसे मिळाले नाहीत. मार्केटींग फेडरेशनच्या कार्यालयात गेल्यावर अधिकारी दाद देत नसल्याचे घुगे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या प्रकारामुळे उपासमारीची वेळ आली असुन २ फेब्रुवारीपर्यंत माझा शेतमाल अर्थात सोयाबीन परत द्यावे अन्यथा आजच्या बाजारभावाप्रमाणे पैसे द्यावेत, अशी मागणी घुगे यांनी केली आहे. आमचेच शासन असतांना प्रश्न सुटत नसतील तर दाद कुणाकडे मागायची, अशी हतबलताही घुगे यांनी बोलून दाखवली.