अमेठीनंतर पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या

85

सामना ऑनलाईन । कोलकाता

भाजपच्या अमेठीतील खासदार स्मृती इराणी यांच्या जवळच्या कार्यकर्त्याची रविवारी गोळ्या घालून हत्या झाल्याच्या काही तासानंतरच पश्चिम बंगालमध्येही भाजप कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. चंदन शॉ (24) असे त्या तरुणाचे नाव असून बाईकवरून आलेल्या बुरखाधारी हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.

चंदन हा 24 परगाना जिल्ह्यातील रहिवासी होता. त्याने या निवडणूकीत भाजपचा जोरदार प्रचार केला होता. भाजपला पश्चिम बंगालमध्ये या निवडणूकीत चांगले यश मिळाले आहे. रविवारी चंदन भाजपच्या एका बैठकीला गेला होता. तेथून रात्री उशीरा घरी परतत असताना त्याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात त्याचा जागीच मृत्यू झाला.

पश्चिम बंगालमध्ये निवडणूकांच्या सातही टप्प्यात हिंसाचार झाला. निवडणूकीचा निकाल लागल्यानंतरही हा हिंसाचार सुरूच असल्याचे समोर आले आहे. निकालानंतरही भाजपचे कार्यालय फोडणे, भाजप तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हल्ले असे प्रकार सुरूच आहेत. पश्चिम बंगालचे वनमंत्री बिनाय कृष्णा बर्मन यांच्या ताफ्यावर देखील रविवारी दगडफेक करण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या