हिंमत असेल तर 105 आमदारांचे राजीनामे घ्या, खासदार संजय राऊत यांचे शहांना प्रतिआव्हान

महाराष्ट्रातील सत्ता गेल्यामुळे भाजपच्या राज्यातील नेत्यांसह केंद्रीय नेतेदेखील वैफल्यग्रस्त आहेत. हिंमत असेल तर भाजपने आपल्या 105 आमदारांचे राजीनामे घ्यावेत आणि निवडणूक लढवून दाखवावी, असे प्रतिआव्हान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी पुण्यात शिवसेनेने हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक घ्यावी, असे आव्हान दिले होते. यावर खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, अमित शहा यांनी केलेले वक्तव्य असत्याला धरून आहे. आमच्या सरकारविषयी, शिवसेनेबद्दल, हिंदुत्वाबद्दल प्रश्न उपस्थित करून राज्यातील जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांकडून दोन वर्षांपासून सुरू आहे.

सत्तेसाठी शिवसेनेला दूर करा सांगणारे कोण होते

हिंदुत्वाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा कधीही सोडलेला नाही. आमच्यासारख्या प्रखर हिंदुत्ववादी पक्षाला सत्तेसाठी दूर करताना आणि सत्तेचा वाटा जास्त मिळावा यासाठी 2014 साली शिवसेनेला दूर करा असे राज्यातील नेत्यांना खासगीत सांगणारे कोण होते, हे अमित शहा यांनीच स्पष्ट करावे, असे आवाहनही राऊत यांनी केले.

शिवरायांच्या भूमीत खोटे बोलू नये

सत्तावाटपाबाबत शिवसेना खोटं बोलत असल्याचे अमित शहा यांनी म्हटले होते. या वक्तव्याचा समाचार घेताना संजय राऊत म्हणाले, मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शहा यांच्या उपस्थितीत 50-50 टक्के सत्तावाटप ठरले होते. पुणे ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे. या ठिकाणी त्यांनी सोन्याचा नांगर फिरवला होता. त्यामुळे पुण्यात तरी शहा यांनी खोटं बोलू नये.

हेमामालिनी यांच्याविषयी आदर

गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याविषयी विचारले असता संजय राऊत म्हणाले, ‘गुलाबरावांच्या वक्तव्याकडं मी नकारात्मक दृष्टीनं बघत नाही. अशा प्रकारची तुलना यापूर्वीही झालेली आहे. हा एक प्रकारे हेमामालिनी यांचा सन्मान आहे. यापूर्वी लालू प्रसाद यादव यांनीही असंच उदाहरण दिलं होतं. हेमामालिनी यांच्याविषयी आम्हाला आदरच आहे.’