भाजपचे सोशल मीडियाप्रमुख अमोल कोंडबत्तुनवार यांचे निधन

सामना ऑनलाईन । नागपूर

भारतीय जनता पक्षाचे चंद्रपूर जिल्हा सोशल मीडियाप्रमुख अमोल कोंडबत्तुनवार यांचे आज सकाळी ६ वा. च्या सुमारास अपघाती निधन झाले. राज्याचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले अमोल कोंडबत्तुनवार हे मागील दोन वर्षांपासून भाजपचे सोशल मीडिया जिल्हाप्रमुख म्हणून काम करीत होते. मूळचे सावली येथील रहिवासी असलेले अमोल कोंडबत्तुनवार हे भाजपच्या बातम्या सोशल मीडियाद्वारे सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम करीत होते.

वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर आज ते चंद्रपूर जिल्ह्यात येणार होते. त्यांच्या स्वागतासाठी अमोल कोंडबत्तुनवार हे नागपूरकडे जात असताना सकाळी ६ वाजता नागभिड-नागपूर मार्गावरील भुयार गावाजवळ हा अपघात झाला असून त्यातच त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. अमोलचे अपघाती निधन होणे ही बाब मनाला चटका लावणारी असून, पक्षाची मोठी हानी झाली आहे. एक सच्चा कार्यकर्ता हरपल्याची प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. अमोलच्या निधनामुळे मुनगंटीवार यांनी त्यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याची सूचना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केली आहे.

अमोल कोंडबत्तुनवार भाजपचे सक्रिय कार्यकर्ते होते भाजपच्या मोठया नेत्याच्या वाढदिवसापासून सरकारचे निर्णय किंवा पक्षाच्या पातळीवरच्या अनेक घडामोडी सोशल मीडीयाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचवत होते. त्याच्या लग्नाला दोन दिवसांपूर्वीच एक वर्ष पूर्ण झाले होते. सुधीर मुनगंटीवार यांचे कट्टर समर्थक असलेले अमोल राज्यभरातल्या व्हाट्सअपच्या ६०० ग्रुपवर सक्रीय होते त्यावरुन त्यांची संपर्काची हातोटी दिसून येते.