BKC-पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडणारा नवा पूल जून 2019 पर्यंत सुरू होणार

सामना ऑनलाईन, मुंबई

ही बातमी वाहतूक कोंडीने त्रासलेल्या मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची आहे. BKC आणि पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडणाऱ्या नव्या पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आलं असून रविवारी घेतल्या जाणाऱ्या मेगाब्लॉकदरम्यान सायन स्थानकाजवळ या पुलासाठीचे गर्डर टाकण्याचं काम केलं जाणार आहे. यासाठी मेगाब्लॉकमधली कोणती वेळ द्यायची हे अजून निश्चित झालेलं नाहीये. हा पूल झाल्यास SCLR म्हणजेच सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडला नवा पर्याय तयार होणार असून बीकेसीला याणाऱ्यांच्या वेळात बरीच बचत होणार आहे.

या नव्या पुलामुळे पूर्व द्रुतगती महामार्ग आणि LBS मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर कमी होईल अशी अपेक्षा एमएमआरडीए ने व्यक्त केली आहे. सायन धारावी रस्त्यावरील वाहतूकही या मार्गामुळे कमी होणार आहे. सध्या या मार्गावर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे वाहनचालकांचे प्रचंड हाल होत आहेत. या पुलाचे काम खरंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पूर्ण होणार होतं, मात्र कामाचा आढावा घेतल्यानंतर हा  पूल पूर्ण होण्यासाठीची वेळमर्यादा मार्च महिन्यापर्यंत वाढवण्यात आली होती. आता हा पूल प्रवाशांच्या सेवेमध्ये रुजू होण्यासाठी जून महिना उजाडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मध्य रेल्वेकडून मिळणाऱ्या परवानग्या वेळत न मिळाल्याने या पुलाचं काम रखडल्याचं सांगण्यात आलं आहे. सुरुवातीला या पुलाची किंमत 261 कोटी रूपये इतकी होती, मात्र काही बदल केल्यानंतर ही रक्कम 203 कोटींपर्यंत खाली आणण्यात यश आलं.