Black In Fation

पूजा पोवार, फॅशन डिझायनर

संक्रांती म्हणजे काळा रंग. आज तरुणाईत फॅशनसाठी काळा रंग ‘इन’ आहे. पाहूया काळ्या रंगाचे कौतुक.

काळा रंग… सर्व रंगाचं प्रतिनिधित्व करणारा किंवा इतर रंगांना सामावून घेणारा… तरुणाईला गडद किंवा फिकट रंगाचे कपडे जसे आकर्षित करतात, त्याप्रमाणेच काळ्या रंगाचे कपडे वापरण्याची क्रेझही असतेच. तरीही संक्रांतीनिमित्त काळ्या रंगाच्या कपड्यांची वेगवेगळ्या पद्धतीने आधुनिक फॅशन करून सणानिमित्त तरुणाईही काळ्या रंगाचे कपडे वापरून स्वतःला स्टायलिश लूक देऊ शकते.

मकरसंक्रांतीला काळे कपडे घालण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी काळं वस्त्र परिधान करत नाहीत. तरीही संक्रांतीच्या दिवसांत काळे कपडे आवर्जून घातले जातात. कारण या कपड्यांमध्ये नकारात्मकता दूर करण्याचं काम केलं जातं. या दिवसांत तापमानही उष्ण, ऊबदार असतं. त्यामुळे ऊबदारपणा जाणवण्यासाठी आणि उष्णता शोषून घेण्यासाठी काळे कपडे या दिवसांत वापरले जातात. हे वैज्ञानिक कारण या कपड्यामध्ये आहे.

फॅशनच्या दृष्टीने या कपड्यांचा विचार करता हल्ली नवनव्या डिझाईनचे कपडे या दिवसांत वापरता येऊ शकतात. पूर्वीच्या तसेच आजही स्त्रीया काळी चंद्रकला परिधान करतात. बोरन्हाणाच्या वेळी बाळालाही काळे कपडे घातले जातात. तरीही आधुनिक काळात वेगवेगळ्या प्रकारे काळ्या रंगाचे कपडे वापरता येऊ शकतात. काळी साडी संक्रांतीला नेहमीच नेसली जाते. मात्र यावेळची संक्रांत काळा रंगाचे कपडे अनोख्या पद्धतीनेही परिधान करता येऊ शकतात. जेणेकरून पारंपरिकताही जपली जाईल आणि आधुनिक फॅशन केल्याचा आनंदही मिळेल.

मुलांसाठीही…
महिला किंवा मुलींप्रमाणे तरुण मुलेही काळ्या रंगाचा फँशन म्हणून वापर या दिवसांत करू शकतात. ट्राऊजर काळ्या रंगाची पँट किंवा पँट आणि शर्ट दोन्हीही काळ्या रंगाचे घालू शकतात. मुले काळ्या रंगाच्या डेनिमवर काळा कुर्ता किंवा काळी डेनिम घालून युवकही संक्रांत साजरी करू शकतात.

नवीन फॅशनची साडी
जरीची काळी साडी संक्रांतीला दरवर्षी वापरतो त्याऐवजी सिल्कची थ्रेड वर्क केलेली काळ्या रंगाची साडी वापरू शकता. त्यावर जरी नसते. त्यावर पूर्ण हाताचं ब्लाऊज छान दिसतं. जाळीचं किंवा नक्षीकाम केलेलं ब्लाऊज अशा साडीवर उठून दिसतं. यावर ऑक्सडाईड दागिने घालू शकता. कानातले, भरपूर बांगड्या, हार असे दागिने उठून दिसतील. सर्व दागिने घालायला हवेत असे नाही, तर एक कोणताही दागिना नाही घातला तरी चालू शकतं.

मुलींकरिता पोषाख
सलवार-कुर्त्यामध्ये थ्रेड वर्क, कुयरी वर्क किंवा कश्मिरी वर्कचे कुर्ते वापरू शकता. ते थोडेसे मोठे वाटतात. त्याखाली लेगिनऐवजी पेन्सिल ट्राऊजर पँट किंवा सिगरेट पँट, त्यावर दुपट्टाही घेता येतो. हिवाळ्यात हा पोषाख चांगला दिसते. पलाझो पँट, अँकल लेंथ पँट असे पर्याय उपलब्ध आहेत. हल्ली गाऊनसारखे संपूर्ण कुर्तेही बाजारात आले आहेत. लाँग लेंथ कुर्त्यांचे बाजूचे कटला (स्लिट) कमरेपासून एकच कट देऊ शकता. त्याखालीही पँट वापरू शकता. लेगिनऐवजी असेही पर्याय उपलब्ध आहेत. अशा कुर्त्यांचे हात लांब किंवा स्लीव्हलेस ठेवून त्यावर उठून दिसणारं जॅकेटही वापरू शकता. जेणेकरून काळ्या रंगाला उठाव येईल. ही एक नवी फॅशन म्हणून करून बघायला हरकत नाही. हा स्टायलिशही दिसतो. त्यामुळे कार्यालयातही घालू शकता.

पारंपरिकता जपणारे आधुनिक कपडे
डेनिम काळ्या रंगाची छान दिसेल. या सणानिमित्त संपूर्ण काळे कपडे ही वापरता येईल. जीन्सवर टॉप, शूजही वापरू शकता. पूर्ण काळा कुर्ताही छान दिसेल. कुर्ता, लेगिन काळ्या रंगाची तसेच जीन्स आणि टॉप दोन्हीही काळ्या रंगाचे असेही कपडे घालू शकता. त्यावर आवडीनुसार काळ्या रंगाचे बूट किंवा चपला उठून दिसतील याप्रमाणे घालाव्यात.

स्टायलिश लूकसाठी
ज्यांना स्वतःला संपूर्णतः स्टायलिश लूक द्यायचा आहे. त्याला अँकल लेंथ पँट वेगवेगळ्या डिझाईनच्या त्यावर काळ्या रंगाचा कुर्ता वापरू शकता. त्याला कमरेपासून खूप फ्रिल ठेवायचा किंवा अगदी घट्ट कुर्ता असेल त्यावर पट्टाही बांधू शकता. ट्युनिक टॉप घातला की, काहीतरी वेगळं घातल्याची मजाही घेता येईल. यावरही ऑक्सडाईड दागिने घालायचे. कारण एरवी ते वापरले जात नाहीत.