काळे पैसे सफेद करणा-या २५० बोगस राजकिय पक्षांची मान्यता रदद होणार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली 

निवडणूक आयोगाने बोगस राजकिय पक्षांच्या भोवती फास अडकवण्यास सुरुवात केली आहे. यांतर्गत काळा पैसा पांढरा करण्यात सहभागी असल्याच्या संशयावरुन २५० बोगस राजकिय पक्षांची मान्यता रदद करण्याचा विचार निवडणूक आयोग करत आहे.

हिंदुस्थानात तब्बल १९०० राजकीय पक्ष आहेत. त्यात फक्त ७ राष्ट्रीय पक्ष, ५८ प्रादेशिक पक्ष आहेत. निवडणूक आयोगाकडील माहितीनुसार त्यापैकी देशातील २५० राजकिय पक्ष फक्त कागदावरच आहेत. या राजकिय पक्षांनी २००५ पासून कुठलीही निवडणूक लढवलेली नसून देणगीतून मिळालेला काळा पैसा पांढरा करण्याचा उद्योग त्यांनी सुरु केला आहे.

या पक्षांची मान्यता रदद करण्याचा विचार निवडणूक आयोग करत आहे. निवडणूक आयोग लवकरच या राजकिय पक्षांच्या आर्थिक प्रकरणांचा तपास करण्यासंबंधी आयकर विभागाला पत्र लिहणार आहे. आयकर विभागाला राजकिय पक्षाची नोंदणी करण्याचा अधिकार असला तरी ती रदद करण्याचा अधिकार मात्र नाही. यामुळे सध्या फक्त त्यांची मान्यता रदद करण्यात येणार आहे.