गॅस पाईपलाईनचा स्फोट, 73 जणांचा होरपळून मृत्यू

5

सामना ऑनलाईन । मेक्सिको सिटी

उत्तर मेक्सिकोमधील तलाहुलीपण शहराती शुक्रवारी रात्री गॅस पाईपलाईनचा स्फोट होऊन 73 जण ठार झाले आहेत. या दुर्घटनेत सत्तरहून अधिक जण जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेतील मृतांचे मृतदेह तब्बल 100 टक्के जळाले असून काहींची तर ओळख देखील पटवने मुश्कील झाले आहे.

दुर्घटना झाली त्या ठिकाणी काही कार्यक्रमानिमित्त अनेक जण एकत्र आले होते. तेथून जवळच गॅसची एक मोठी पाईपलाईन होती. त्या पाईपलाईला तडा जाऊन अचानक त्यात मोठा स्फोट झाला व आगीच्या मोठ्या ज्वाळा पसरल्या. या दुर्घटनेमुळे तेथे उपस्थित अनेक जण आगीच्या कचाट्यात सापडले. तसेच धावपळीमध्ये चेंगराचेंगरी देखील होऊन काही जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत 73 जण ठार तर 70 हून अधिक जण जखमी झाले. जखमींमध्ये काही मलांचा देखील समावेश आहे.