नोकरीत बडतर्फ किंवा स्थगितीचे योग (Suspended in Job)

6

anupriya-desai-astrologer>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तु विशारद)

नोकरीसंदर्भात कुंडली विवेचनसाठी बरेच जातक येत असतात. त्यात IT क्षेत्रातील, प्रायव्हेट कंपनीत नोकरी करणारे, सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तिंचा समावेश आहे. गेल्या काही महिन्यात कुंडली विवेचनसाठी तीन सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तिंनी भेट घेतली. ह्या तिन्ही व्यक्ति सरकारी क्षेत्रात मोठ्या अधिकाराच्या पदावर कार्य करणाऱ्या आहेत. (गोपनीयता जपण्यासाठी त्यांची नावे आणि कार्यक्षेत्र इथे जाहीर करू शकत नाही) तिन्ही व्यक्तिंना नोकरीत काही कारणास्तव स्थगिती निर्देशित करण्यात आली होती. तिन्ही व्यक्ती वेगवेगळ्या स्तरावर कार्यरत असून ते एकमेकांना ओळखत नाहीत ह्याची नोंद घ्यावी. ह्या तिन्ही व्यक्तींच्या कुंडलीचा अभ्यासकरिता त्यांच्या कुंडलीत काही विशिष्ट योग घडून येताना त्यांना नोकरीत स्थगिती मिळाली असल्याचे निदर्शनास आले. आज आपण कुंडलीतील ह्या योगाची माहिती घेणार आहोत.

कुंडलीतील काही स्थानांची माहिती इथे देत आहे. –
१) लग्न स्थान/प्रथम स्थान – ह्या स्थावरून तुमची विचारसरणी,तुमचा कल इ. गोष्टींची माहिती मिळते.
२) द्वितीय स्थान/धन स्थान – ह्या स्थावरून तुम्हाला कुठल्या प्रकारे धनप्राप्ती होणार ? व्यवसाय केल्याने की नोकरी केल्याने तुम्हांला फायदा आहे हे लक्षात येते.
३) षष्ठ स्थान – नोकरीचे स्थान – ह्या स्थानावरून तुम्ही कुठे नोकरी करणार ?तुमच्या कार्यक्षेत्राची माहिती ह्या स्थावरून मिळू शकते. बँकेत नोकरीचे योग, सरकारी नोकरीचे योग ह्या स्थावरून कळू शकते.
४) दशम स्थान – ह्या स्थावरून तुम्ही व्यवसाय करणार का ? हे कळू शकते. तुम्ही भविष्यात वकील होणार आहेत ? राजकारणात असणार आहात ? इंजिनिअर की डॉक्टर ? डॉक्टर असाल तर कोणत्या क्षेत्रातील डॉक्टर ? इंजिनिअर मग कुठच्या क्षेत्रात इंजिनिअर हे कळू शकते.
५) नवम स्थान – ह्या स्थावरून तुमचे समाजातील स्थान,नोकरीतील दर्जा म्हणजेच तुमचे Status समजून येते. नवम स्थानाचा भरभक्कम पाठिंबा असल्यावर तुम्ही गरीब किंवा श्रीमंत असा, तुमचे समाजातील स्थान अबाधित रहाते.
६) अष्टम स्थान – हे खूप सवेंदनशील स्थान आहे. ह्या स्थानाचा संबंध येणे आणि दशा -अंतर्दशाही ह्या स्थानाला पूरक ठरत असतील तर नोकरीत मानहानीचे योग संभवतात. नोकरीत स्थगिती येऊ शकते.

अ) पहिली कुंडली आहे अजय पोतदार ह्यांची (अर्थात नाव बदलेले आहे ). वृषभ लग्न आणि कन्या राशीची कुंडली. मार्च महिन्यात मला अजय ह्यांचा फोन आला. नोकरीत स्थगिती तर दिली गेली होतीच परंतु त्यांच्यावर त्यांच्या सहकारी व्यक्तिने त्यांच्यावर कोर्टकेस केली आहे. जेंव्हा हे सर्व घडत होते तेंव्हा अजय ह्यांच्या कुंडलीत नवम स्थानाचा आणि दशम स्थानाचा स्वामी शनि अष्टम स्थानांतून गोचर करीत होता. दशम स्थानाचा स्वामी अष्टम स्थानांतून म्हणजेच स्थगिती आणि नवम स्थानाचा स्वामी अष्टम स्थानांतून गोचर करीत आहे म्हणेजच मानहानीचे संकट. त्यामुळे अजय ह्यांना हा मनस्ताप झाला. त्यात अजय ह्यांना केतूची अंतर्दशा सुरु आहे. केतू अष्टम स्थानाचा कार्येश. ऑगस्ट २०१८ पासून दशा बदलत असल्याने त्यांच्यावरील हे संकट दूर होणारच. परंतु कुंडलीतील योगाने प्रचिती दिलीच.

ब) दुसरी कुंडली आहे अर्चना मोरे ह्यांची (नाव बदलेले आहे ). मीन लग्न आणि मकर राशीची कुंडली. साडेसाती सुरु जानेवारी २०१७ रोजी. गोचरीने दशमेश गुरु सुद्धा अष्टमात. त्यांना suspend करण्यात आले नोव्हेंबर – डिसेंबर २०१७ रोजी. ह्या काळात शुक्र अंतर्दशा अष्टम स्थानाशी निगडीत. त्यांना suspend करण्यात आले ते दुसऱ्याच एका व्यक्तिच्या चुकीमुळे. ते कुंडली विवेचनसाठी आले तेंव्हा तुम्हांला सन्मानाने नोकरीत रुजू करून देतील असे सांगितले. आणि गेल्याच महिन्यात त्यांचा फोन आला – त्यांना नोकरीत पुन्हा रुजू करून घेतले आणि त्यांच्यावरचे आरोप मागे घेण्यात आले.

क) तिसरी कुंडली आहे सिद्धेश शेणॉय ह्यांची. सिंह लग्न आणि मिथुन राशीची कुंडली. साडेसाती जरी नसली तरी चंद्राच्या सप्तम स्थानातून होत असलेले शनिचे भ्रमण आणि गुरु ह्या ग्रहाचे अष्टमाच्या अष्टमातून (म्हणजेच कुंडलीच्या तृतीय स्थानातून )होत असलेले भ्रमण नाहक मानहानीस कारणीभूत ठरले. नोकरीतून स्थगिती देण्यात आली. कोर्टकेस सुरू झाली. त्याच काळात सिद्धेश भेटण्यास आला. कुंडलीत येणारे पुढचे आश्वासक योग आणि दशा -अंतर्दशा नोकरीसाठी अनुकूल असल्याने नोकरीवर रुजू होण्याचे योग लवकरच आहेत हे सांगितले.

ह्या तीनही कुंडल्यातून एकाच गोष्ट निर्देशनास आली ती म्हणजे अष्टम स्थानाशी निगडीत असलेली दशा -अंतर्दशा, अष्टम स्थानातून होत असलेले ठराविक स्थानांच्या अधिपतींचे भ्रमण ह्यांमुळे नोकरीत मानहानी स्वीकारावी लागली.

आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा: [email protected]

संपर्कसाठी मोबाईल क्रमांक- ९८१९०२१११९ (फक्त संध्याकाळी ६ ते ८ यावेळातच फोन करणे)