अनुजा का ‘मत’!

jyotsna-gadgil>> ज्योत्स्ना गाडगीळ

‘भारतीय शास्त्रीय संगीत’ शिकणे हा एकीकडे तरुणांच्या अनास्थेचा विषय आहे, तर दुसरीकडे प्रतिष्ठेचा! ज्यांना शास्त्रीय संगीताचे आकलन होत नाही, ते दुर्लक्ष करतात आणि जे शिकतात, ते केवळ अनुकरण करतात. मात्र भारतीय शास्त्रीय संगीत वृद्धिंगत होण्यासाठी गरज आहे, ती शास्त्रीय संगीत अभ्यासणाऱ्या अभ्यासकांची! पण अभ्यास म्हटला की, परिश्रम आले, परिश्रम घेण्याची तयारी आली. ती तयारी दाखवली आहे, अनुजा कामत हिने! सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेत भारतीय शास्त्रीय संगीताची तोंडओळख करून देत आहे.

`जब दीप जले आना’, `चंदन सा बदन’, `जरा सी आहट होती है’, `नाम गुम जाएगा’, `निगाहे मिलाने को जी चाहता है’ ही गाणी सर्वांना माहीत आहेत, परंतु ती `यमन’ रागात आहेत, हे सर्वांनाच माहीत असेल असे नाही! एस. डी. बर्मन, सी. रामचंद्र, वसंत देसाई, नौशाद, एस. एन. त्रिपाठी ह्या संगीतकारांनी सर्वसामान्य लोकांना हिंदी-मराठी गाण्यांतून शास्त्रीय संगीताची आवड लावली. हाच धागा पकडून अनुजा आताच्या पिढीला शास्त्रीय संगीताची तोंडओळख करून देत आहे.

`खटके, मुर्की, तान, आलाप, बोलआलाप, मिंड, गमक, अलंकार, लय’ ही शास्त्रीय संगीताची परिभाषा सोपी करून सांगताना अनुजा नव्या-जुन्या हिंदी गाण्यांचा आधार घेते. जसे की, `आंदोलन’ कशाला म्हणतात, हे समजावताना ती `पुछो ना कैसे मैने रैन बिताऽऽऽयी’ गाण्याचे प्रात्यक्षिक देते. एकेका ओळीत तिने दिलेली उदाहरणे सामान्य प्रेक्षकांनाच नाही, तर संगीताचे प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही उपयुक्त ठरत आहेत.

अनुजा सुगम संगीताची विद्यार्थिनी. शाळेत कवितांना स्वत: चाली लावून ती स्पर्धेत सादर करायची. तिचा आवाज आणि संगीताची उपज पाहून `तिने संगीत शिकावे’ असे एका शिक्षिकेने तिच्या आईला सुचवले. गायिका उत्तरा केळकर ह्यांनी नुकताच संगीत वर्ग सुरू केला होता. अनुजा त्यांची पहिली विद्यार्थिनी! आठ वर्षांची अनुजा सुगम संगीताबरोबरच उत्तरातार्इंकडून शास्त्रीय संगीताची तोंडओळख करून घेऊ लागली. शास्त्रीय संगीतात तिची रुची वाढावी म्हणून तिचे पालक तिला अनेक मैफिलींत घेऊन जात असत. परंतु, शास्त्रीय संगीत कळण्याइतके तिचे वय नव्हते आणि तिला आवडही नव्हती. दरम्यान तिच्या आईने अनेक गुरूंकडे तिला शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी पाठवले, परंतु त्यांचा हेतू साध्य झाला नाही.

अनुजाचे सुगम संगीताचे प्रशिक्षण सुरू होते. ती अनेक कार्यक्रमांतून बालकलाकार म्हणून गाणीही सादर करत होती. दहावीत असताना `सा रे ग म प लिटल चॅम्प’मध्येही तिने सहभाग घेतला होता. मात्र, तीन भागांनंतर तिला मागे परतावे लागले. पुन्हा लक्ष अभ्यासावर केंद्रित करून तिने दहावीत चांगले गुण मिळवले. अभ्यासात तर ती हुशार होतीच, शिवाय तिची चित्रकलाही चांगली होती. आईला वाणिज्य शाखेची, तर बहिणीला आणि वडिलांना वैद्यकीय शाखेची पार्श्वभूमी असताना अनुजाने मात्र कलाशाखेत जाण्याचा निर्णय घेतला. तसे असले, तरी तिला चित्रकलेचे चाकोरीबद्ध प्रशिक्षण घेऊन पदवीधर व्हायचे नव्हते. तिने स्वयंअध्ययनातून चित्रकला वाढवली आणि पदवीचे शिक्षण अर्थशास्त्रातून घेतल़े त्याच वेळेस उत्तरातार्इंच्या सांगण्यावरून अनुजाने मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात शास्त्रीय संगीत पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. तिथे गायिका शुचिता आठलेकर तिला गुरू म्हणून लाभल्या. अवघड विषय सोपे करून शिकवण्याची त्यांची हातोटी अनुजाला आवडली. तिला शास्त्रीय संगीतात रस वाटू लागला. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त ती पुस्तकांतून माहिती संकलित करू लागली.

`गुगल’, `यू ट्यूब’ ही माध्यमे हाती लागल्यावर अनुजा तिथेही भारतीय शास्त्रीय संगीताची माहिती शोधू लागली. यू ट्यूबवर अनेक गायकांचे, वादकांचे व्हिडीओ होते, परंतु शास्त्रीय संगीताची ओळख करून देणारी माहिती दृक्श्राव्य माध्यमात उपलब्ध नव्हती. आपण ती माहिती पुरवावी, असा विचार तिच्या मनात डोकावला. पदवीचे शिक्षण पूर्ण होत असतानाच तिने ह्या उपक्रमाला सुरुवात केली. अॅनिमेशन, ग्राफिक्स हाताळण्याची सवय आणि आवड असल्याने तिने स्वत:च स्वत:चे व्हिडीओ बनवायचे ठरवले. भरत चांदोडकर ह्या मित्राच्या मदतीने स्वत:चे यू ट्यूब चॅनेल सुरू केले. तीन वर्षे ती शास्त्रीय संगीताची प्राथमिक माहिती प्रात्यक्षिकांसह देत होती. अगदी तीन महिन्यांपूर्वीपर्यंत तिच्या प्रेक्षकांची संख्या १९,००० होती, परंतु शास्त्रीय संगीत आणि बॉलीवूडची गाणी हा मिलाफ केल्यानंतर तिच्या प्रेक्षकसंख्येत दुपटीने वाढ होत ती ४५,००० च्या वर गेली आहे.

अनुजाच्या व्हिडीओची दखल सर्वसामान्य रसिकांनीच नाही, तर पं. ध्रुव घोष, शुभा मुद्गल, अनीष प्रधान, सुधीर नाईक, धनश्री पंडित राय यांसारख्या संगीत क्षेत्रातील दिग्गज मंडळींनीदेखील घेतली आहे. अनुजाचे व्हिडीओ व्हॉट्स अॅप, इन्स्टाग्राम, फेसबुकवर शेअर केले जात आहेत. देशोदेशातील लोकांकडून तिच्या कामाचे कौतुक केले जात आहे. तिच्या चॅनेलवर तसेच ईमेलद्वारे लोक तिला प्रतिक्रिया देत असतात, सूचना देतात आणि अपेक्षित असलेल्या माहितीची फर्माईशही करतात.

सार्वजनिक ठिकाणांप्रमाणे सोशल मीडियावरही काही आंबटशौकिन लोकांचा सुळसुळाट असतो. एक तरुण सुंदर मुलगी काहीतरी बोलत आहे, पाहून अनेकांनी व्हिडीओ पाहिला, पण सरतेशेवटी खूप छान माहिती मिळाली, अशी जाहीर कबुली त्याच लोकांनी दिल्याचे अनुजा सांगते. ह्या उपक्रमाबद्दल अनुजा आपले मत मांडते, मी काही वेगळे सांगतेय असे नाही, फक्त अवघड वाटणारे संगीत शास्त्र मी माझ्या पद्धतीने सोपे करून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात सूर, ताल, लय, विलंबित ख्याल, राग, रागिणी, तराणा, टप्पा, ठुमरी, तानेचे प्रकार अशा अनेक विषयांवर भाग केले आहेत. आतापर्यंत ५० व्हिडीओ तयार झाले आहेत, ते मी एकहाती केले आहेत. माझ्यातल्या सगळ्या कला त्यात पणाला लावल्या आहेत. माझा संवाद एकसुरी होऊ नये, म्हणून त्यात चित्रांचा, वाक्यांचा, व्हिडीओचा समावेश केला आहे. सांगितलेल्या गोष्टींपेक्षा बघितलेल्या गोष्टी जास्त काळ स्मरणात राहतात, म्हणून मी आवश्यक तिथे चित्रांचाही वापर केला आहे. बालपणापासून वाचनाची आवड असल्याने आजवर मी बरीच माहिती संकलित केली आहे. संगीत विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतल्याने कॉलेजमधून तसेच शिक्षकांकडूनही बरीच माहिती मिळाली आहे. एक-एक विषय निवडून वेळ मिळेल तेव्हा मी व्हिडीओ तयार करते आणि एडिटिंग करते. व्हिडीओ अपलोड करताना दरवेळी थोडीशी भीती असते, लोकांना नवीन विषय आवडेल का, ही शंका असते, पण काही तासांतच लोकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून पुन्हा नवीन काहीतरी देण्याचा उत्साह येतो.’

अनुजा इंग्रजी माध्यमात शिकलेली असल्यामुळे तिचे सगळे व्हिडीओ हिंदी आणि इंग्रजी भाषेत आढळतात. अतिशय ओघवत्या भाषेत विषय मांडल्यामुळे प्रेक्षकांना भाषेचा अडसर होत नाही. तिला कविता करण्याची, वाचण्याची आवड आहे. जागतिक संगीताबद्दल कुतूहल आहे. लोकसंगीताची आवड आहे. मराठी, राजस्थानी, कोंकणी, उडिया, बंगाली, गुजराथी, ब्रज, आसामी, पंजाबी, तामीळ, मल्याळम, कन्नड इ. प्रादेशिक भाषांतील लोकगीते तिने अर्थ समजून घेत पाठ केली आहेत. तिला मुलाखती घेण्याची आवड आहे. भारतीय संस्कृती संबंधित कोणत्याही विषयावर काम करण्यास प्रसारमाध्यमात जायला आवडेल, असे ती सांगते. तिला पीएच.डी. करायची आहे, परंतु डीग्रीसाठी नाही! चांगला विषय हाती लागला आणि त्यात संशोधन करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली, तरच पीएच.डी. करायला आवडेल, असे ती सांगते. तसेच बॉलीवूडमध्ये गाण्याची संधी मिळावी, हेही तिचे स्वप्न आहे.

झेविअर्स कॉलेजमध्ये शिकत असताना अनुजा सांस्कृतिक विभागात आयोजक म्हणून काम करत होती. त्यामुळे तिला गायनाबरोबरच संगीत मैफिलींचे आयोजन करण्याचाही अनुभव मिळाला होता. तोच अनुभव आता तिच्या कामी येत आहे. सध्या ती तिच्या आईच्या भांडुपस्थित शाळेत कलाशिक्षक आणि सांस्कृतिक विभागप्रमुख म्हणून काम पाहते, मुलांना गाणी शिकवते. तिला इतर राज्यातून व्याख्यान आणि सादरीकरणासाठी आमंत्रणे मिळत आहेत. त्याचबरोबर सुगम संगीताचे कार्यक्रमही ती करते.फावल्या वेळेत `एनसीपीए’ ग्रंथालयात जाऊन पुस्तक वाचते आणि आपल्या प्रेक्षकांना नवीन काय माहिती देता येईल यासंबंधी तयारी करते.

सारेगमप मधून निघताना गायक सुरेश वाडकर ह्यांनी अनुजाला मंत्र दिला होता, `तू गातेस छान, पण गाणं आणखी छान सांगायचा प्रयत्न कर!’ हेच शब्द बहुदा अनुजाने मनावर कोरून घेतले असावेत, म्हणूनच आता ती केवळ गाणं सांगत नाही, तर त्याची पाश्र्वभूमी, संगीत, संगीताचे बारकावे आणि त्यावर अनुजा का `मत’ मांडायला विसरत नाही! संगीतक्षेत्रात गायक, संगीतकार आणि संशोधक म्हणून भरीव कामगिरी आपल्या हातून घडावी ही तिची इच्छा आहे. भारतीय शास्त्रीय संगीतात सर्वांना रूची निर्माण व्हावी आणि त्याचा प्रसार व्हावा, यादृष्टीने ती आपल्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. तिच्या प्रयत्नांना उत्तरोत्तर यश मिळत राहो आणि भारतीय शास्त्रीय संगीताला असेच अभ्यासक मिळत राहोत, ही सदिच्छा!