आहेर, बजेट आणि बरेच काही!

>>ज्योत्स्ना गाडगीळ

लग्नपत्रिका हाती आल्यावर मुख्य मायना वाचून झाला की थेट लक्ष जाते, ते बॉटम लाईनकडे! ‘कृपया आहेर आणू नये’ हे वाक्य असेल, तर प्रश्नच मिटतो, परंतु ते वाक्य नसेल, तर बायकांची विचारचक्रे गरागरा फिरू लागतात. चित्रगुप्त आपल्या कार्याची काय नोंद ठेवत असेल, त्यापेक्षा अचूक नोंद बायकांच्या डोक्यात असते. कारण, कोणी कधी काय दिलं होतं, हे त्यांना चांगलंच लक्षात राहतं. आहेर काय द्यायचा, ह्या विचाराने बायकांच्या डोक्यातला कॅटलॉग आपोआप उघडतो.

साड्या, भांडी, क्रोकरी, शर्टपीस-पँटपीस असा आजवर मिळालेला ऐवज त्यांच्या कपाटात आणि डोक्यात साठवून ठेवलेला असतो. `जशास तसे’ ह्या नियमाप्रमाणे परतफेड करणे प्राप्त असते. पण आजकाल आहेरात वस्तू देऊन त्या पडून राहण्यापेक्षा पैसे देणं, त्या जास्त पसंत करतात. पण पैसे किती द्यावेत, हा देखील त्यांच्यासमोर यक्ष प्रश्न असतो. ट्रेन ग्रुपमध्ये असाच संवाद सुरू होता. ग्रुपमधल्या एकीचं लग्न होतं. तिने सगळ्यांना मिळून एक पत्रिका दिली असली, तरी प्रत्येकीला आहेर स्वतंत्रच द्यावा लागणार होता. आहेर काय द्यावा, यावर चर्चा रंगलेली…
‘परवावर लग्न आलं, अजून गिफ्ट काय द्यावं कळत नाहीये!’
‘हो गं, मी पण दोन-तीन दुकानात जाऊन आले, ऑनलाईन पण पाहिलं, पण काही खास मिळत नाहीये…’
‘अगं मी ऑनलाईन मस्त बेडशीटचा सेट पाहिला होता, पण बजेटच्या बाहेर होता, मग कॅन्सल केलं!’
‘माझंही तेच झालं, मी मस्त भांड्यांचा सेट पाहिलेला, पण म्हंटलं, तो तिला माहेरून मिळेलच, आपण आणखी कुठे भर घालायची?’
‘सुचवा रे सुचवा…रात्रं थोडी आणि सोंगं फार, असं झालंय!’
‘पण तू साडी नसणारेस की ड्रेस?’
‘गप गं! विषयाला फाटे फोडू नकोस! आज गिफ्टचं फायनल केलंच पाहिजे…’
‘मी काय म्हणते, काही गिफ्ट देण्यापेक्षा सगळ्यांनी मिळून पैसे देऊयात का ? तिला सासरी गेल्या गेल्या हातखर्चाला होतील. काय वाटतं?’
‘ऑप्शन चांगलाय, पण परहेड पैसे किती काढायचे?’
‘मी माझ्या नवऱ्याला घेऊन येणारे, तसंही तिने घरी येऊन ‘सर्वांनी या’ म्हटलंय…मग घरी नवऱ्यासाठी कुठे वेगळा स्वयंपाक करणार, दोघांचे मिळून पाचशे रुपये ठीक वाटतात मला!
‘मी पण तेच करणारे, माझ्या सासूबाई ओळखतात तिला, त्यांनाही चला म्हटलंय, नवऱ्याला ऑफिसमध्ये पार्टी आहे आणि आम्हा दोघींचा जेवणाचा प्रश्न सुटतोय. मला हरकत नाही, मी पण भरते ५०० रुपये!’
‘आमची काही स्वयंपाकातून सुटका नाही, नवऱ्याला भात लागतोच! त्याच्यासाठी सकाळीच कुकरचा हंडा शिजवून ठेवणार आणि पिल्लांना घेऊन मस्त नटून थटून लग्नाला येणार! माझ्याकडूनही ५०० फिक्स!
‘अरे, पण माझ्या घरून मी एकटीच येणारे, मला ५०० चा भुरदंड का? मी २५० च देईन!’
‘मला तर त्यादिवशी दुसऱ्या लग्नाला जायचंय, त्यामुळे काँट्रीब्युशन मध्ये मला धरूच नका!’
‘मी काही तिच्याशी फार बोलत नाही, तोंडओळख आहे फक्त! तुम्ही जाताय म्हणून मी येईन, मी पण फार तर २५० देईन!’
‘ठीक आहे ना, तुम्हा दोघींचे मिळून ५०० झालेच की!’
‘ठरलं तर! आत्ताच सगळ्यांनी पैसे जमा करा, आयत्या वेळेस गोंधळ नको!’
सगळ्यांचे हात पाकिटाकडे गेले आणि त्या ‘क्ष’ मुलीची किंमत, सॉरी सॉरी तिच्या आहेराची किंमत ५०० रुपये ठरली!

 आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. [email protected]